अलिबाग : अलिबागमधील नागरिकांना आणि इथे येणाऱ्या पर्यटकांना मोहून टाकणारा रानमेवा म्हणजे ताडगोळे. उन्हाळ्याचा कडाका दिवसेंदिवस वाढत असताना नागरिकांना नैसर्गिक थंडावा देणारे ताडगोळे सध्या अलिबागसह रायगड जिल्ह्यात सर्वांचेच आकर्षण ठरत आहेत. चवदार, पाणीदार आणि शरीराला गारवा देणारे हे फळ उष्णतेपासून दिलासा देत असल्याने बाजारात त्यांची मागणी लक्षणीय वाढली आहे.

रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात वसंत ऋतूमध्ये ताडगोळ्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. विशेषतः अलिबाग, चौल आणि रेवदंडा परिसरात ताडाची झाडे आढळतात. या झाडांपासून मिळणाऱ्या ताडगोळ्यांच्या विक्रीमुळे अनेक शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत असून हा व्यवसाय शेतीला पूरक पर्याय म्हणून पुढे येत आहे. ताडगोळ्यांचा गर पारदर्शक, मऊ आणि रसाळ असल्याने तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. वाढत्या उष्णतेत शरीराला थंडावा देणारा हा नैसर्गिक ‘एनर्जी फूड’ म्हणूनही ओळखला जातो. त्यामुळे स्थानिक नागरिकांसोबतच अलिबागला येणारे पर्यटकही ताडगोळ्यांची आवर्जून खरेदी करताना दिसत आहेत.

ताडगोळ्यांचा व्यवसाय स्थानिकांसाठी रोजगाराचे महत्त्वाचे साधन ठरत आहे. घरी रात्री उशिरापर्यंत ताडगोळे सोलण्याचे काम सुरू असते आणि पहाटे हे ताजे फळ बाजारात विक्रीसाठी आणले जाते. अनेक ठिकाणी विक्रेते ग्राहकांसमोरच ताडगोळे सोलून देत असल्याने त्यांची मागणी आणखी वाढते. सध्या बाजारात १०० रुपयांना ६ ते ८ ताडगोळे या दराने विक्री होत आहे.

या ताडगोळ्यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. रायगड जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात पिकणारया ताडगोळ्यांना सध्या मोठ्या प्रमाणात मागणी आहे.चौल येथील शेतकरी निलेश काठे यांच्या शेतात सुमारे ५० ताडाची झाडे असून त्यातून त्यांना दरवर्षी दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. त्यामुळे ताडगोळ्यांची लागवड आणि विक्री हा पारंपरिक व्यवसाय आजही अनेक कुटुंबांसाठी आर्थिक आधार ठरत आहे.

आरोग्यासाठी फायदेशीर

ताडगोळे हे केवळ चविष्ट नाहीत, तर आरोग्यासाठीही अत्यंत लाभदायक आहेत. या फळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने शरीरातील उष्णता नियंत्रित राहते. तसेच लोह, पोटॅशियम, फॉस्फरस यांसारखी खनिजे आणि व्हिटॅमिन ए, बी, सी मुबलक प्रमाणात असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. उन्हाळ्यात नैसर्गिक थंडावा देणारे आणि आरोग्यदायी गुणांनी समृद्ध असे ताडगोळे सध्या रायगडकरांसाठी ‘गारव्याचा आधार’ ठरत आहेत.