Discover the best Alibaug tourist places and exciting things to do on your next weekend getaway : अलिबाग हे केवळ त्याच्या सुंदर समुद्र किनाऱ्यांसाठीच नाही, तर ऐतिहासिक वारसा, आध्यात्मिक शांतता आणि चविष्ट कोकणी खाद्यसंस्कृतीसाठीही जगभरात प्रसिद्ध आहे. उन्हाळीच्या सुट्टीत किंवा लाँग विकेंडला अनेकजण अलिबागला जाण्याचे बेत आखतात. पण पर्यटकांना अलिबाग म्हणजे फक्त समुद्र किनारा एवढंच माहितेय. बीचच्या पलीकडेही अलिबागला एक वेगळी संस्कृतीही आहे. अलिबागच्या इतिहासाची साक्ष देणारे अनेक जलदुर्ग येथे आहेत, तसंच अनेक प्राचीन आणि जागृत देवस्थाने आहेत. अलिबागच्या खाद्यसंस्कृतीबद्दल तेथे गेलेल्या पर्यटकांना वेगळं काही सांगायलाच नको. चला तर मग येथील बीचव्यतिरिक्त येथे काय काय प्रसिद्ध आहे, त्यावर एकदा नजर मारुया.
कोलाबा किल्ला
अलिबाग बीचपासून समुद्रामध्ये असलेला कोलाबा हा ऐतिहासिक किल्ला ओहोटीच्या वेळी चालत किंवा घोडागाडीने जाऊन पाहता येतो. भरती असताना किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बोटीचा वापर करावा लागतो. बोटीचे तिकीट साधारणतः ₹२०० (येण्या-जाण्यासाठी) असते. सकाळी १० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत पर्यटक येथे भेट द्यायला जाऊ शकतात. मात्र, भरती-ओहोटीच्या वेळांमुळे याच्या वेळाही बदलू शकतात. भारतीयांसाठी २५ रुपये आणि परदेशी पर्यटकांच्या सोयीसाठी साधारण ३०० ते ५०० रुपये आकारले जातात.
जंजिरा किल्ला
अलिबागपासून साधारण ५५ कि.मी. अंतरावर असलेला मुरुड-जंजिरा हा केवळ किल्ला नसून तो मानवी जिद्द आणि अजोड स्थापत्यकलेचे प्रतीक आहे. हा अभेद्य जलदुर्ग त्याच्या अवाढव्य बांधकामासाठी आणि २३ बुरुजांसाठी प्रसिद्ध आहे. अरबी समुद्रात एका बेटावर वसलेला हा जलदुर्ग गेल्या ३५० वर्षांहून अधिक काळ ‘अजिंक्य’ राहिला आहे. अलिबागवरून तुम्ही खाजगी वाहन किंवा एसटी बसने राजपुरी जेटीपर्यंत जाऊ शकता. तिथून शिडाच्या होड्यांनी किल्ल्यावर नेले जाते. बोटीचा खर्च ८० ते १५० रुपये असू शकतो तर, किल्ल्यामधील प्रवेश शुल्कासाठी २५ रुपये आकारले जातात.
रेवदांडा किल्ला
अलिबागपासून साधारण १७ ते २० किमी अंतरावर असलेला रेवदंडा किल्ला हा पोर्तुगीज स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. हा किल्ला कुंडलिका नदीच्या मुखाशी समुद्रकिनाऱ्याला लागूनच आहे, त्यामुळे येथील नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासारखे असते. सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत पर्यटक येथे जाऊ शकतात. येथे प्रवेश विनामुल्य आहे.
कनकेश्वर मंदिर
लिबागपासून सुमारे १२ किमी अंतरावर मापगावजवळ एका टेकडीवर वसलेले कनकेश्वर मंदिर (श्री क्षेत्र कनकेश्वर) हे एक अतिशय प्राचीन आणि जागृत शिवमंदिर आहे. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी साधारण ७०० ते ७५० पायऱ्या चढाव्या लागतात. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी साधारण ४५ ते ६० मिनिटे लागतात.
बिर्ला मंदिर
अलिबागपासून सुमारे २० किमी अंतरावर सालाव (Salav) गावात एका टेकडीवर असलेले बिर्ला मंदिर हे अलिबागच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे. दुधाल पांढऱ्या संगमवरी दगडातील हे मंदिर त्याच्या अप्रतिम वास्तुकलेसाठी आणि शांत परिसरासाठी प्रसिद्ध आहे. हे मंदिर संध्याकाळी रोषणाईमध्ये अतिशय सुंदर दिसते, त्यामुळे ५:३० नंतर भेट देणे अधिक चांगले ठरते
नागावचे रामेश्वर मंदिर
नागावचे श्री रामेश्वर मंदिर हे अलिबाग जवळील नागाव गावातील अत्यंत प्राचीन आणि जागृत देवस्थान मानले जाते. हे मंदिर त्याच्या शांत वातावरणासाठी आणि पारंपरिक कोकणी स्थापत्यशैलीसाठी प्रसिद्ध आहे. सकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले असते.
मॅग्नेटिक ऑब्झर्व्हेटरी
१९०४ मध्ये स्थापन झालेली ही वेधशाळा विज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठी आणि पर्यटकांसाठी एक महत्त्वाचे ऐतिहासिक स्थळ आहे.
अलिबागची खाद्यसंस्कृती
अलिबागची सफर तिथल्या जेवणाशिवाय अपूर्ण आहे. ताजी मासळी, पापलेट, कोळंबी आणि खेकड्याचे विविध प्रकार येथे अत्यंत चविष्ट मिळतात. तर, अलिबागचा पांढरा कांदा जगप्रसिद्ध असून त्याला भौगोलिक मानांकन (GI Tag) मिळालेले आहे. हा कांदा औषधी गुणांसाठीही ओळखला जातो.
