अलिबाग – अलिबाग-रेवस मार्गावरील नवगाव परिसरातील रामधरनेश्वर पाझर तलावात बुडून दोन चिमुकल्या मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. आशिका नितीन पवार (वय ३) आणि संजना संदीप पवार (वय ८) अशी मृत मुलींची नावे आहेत. सोमवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे रामधरनेश्वर आदिवासी वाडी तसेच नवगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आशिका पवार, संजना पवार आणि त्यांची मैत्रीण माई राजू वाघमारे या तिघी खेळत असताना पाझर तलावाच्या परिसरात गेल्या होत्या. खेळता खेळता आशिका आणि संजना या दोघी पाण्यात बुडाल्या. हा प्रकार लक्षात येताच माई वाघमारे हिने तातडीने वाडीवर धाव घेत नागरिकांना घटनेची माहिती दिली.माहिती मिळताच वाडीतील नागरिकांनी तलावाकडे धाव घेत दोन्ही मुलींना पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना तातडीने अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दोघींनाही मृत घोषित केले.
दोन्ही मुली तलावापासून काही अंतरावर असलेल्या आदिवासी वाडीत राहत होत्या. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, याच पाझर तलावात काही महिन्यांपूर्वी २४ वर्षीय तरुणाचा पोहताना बुडून मृत्यू झाला होता. त्यामुळे या तलावाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तलाव परिसरात सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
