अलिबाग – अलिबाग वडखळ राष्ट्रीय महामार्गाच्या डांबरीकरणसाठी २२ कोटी १४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याच बरोबर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी हालचाली पुन्हा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे अलिबागला येणाऱ्या पर्यटकांची तसेच स्थानिकांची नेहमीच्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

विधीमंडळात विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्या दालनात यासंदर्भातील बैठक पार पडली. या बैठकीला राज्याचे सार्वजनिक बांधकामंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेश बालदी, माजी आमदार सुभाष पाटील, आस्वाद पाटील उपस्थित होते. अलिबाग वडखळ राष्ट्रीय महामार्ग हा सुरवातीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे होता. आता हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. मात्र हस्तांतरणाची तांत्रिक प्रक्रीया पूर्ण झाली नसल्याचे कारण देत दोन्ही यंत्रणांकडून रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात होते.

महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने, वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा आणि चौपदरीकरणासाठी फेरप्रस्ताव सादर करा असे निर्देश यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाला दिले.

केंद्र सरकारच्या रस्ते व परिवहन राज्य मंत्रालयाने यावर्षीच्या वार्षिक कार्यक्रमात या रस्त्याच्या दुरुस्ती कामाला प्रशासकीय आणि तांत्रिक मंजूरी दिली असून, निविदा प्रक्रीयाही पूर्ण झाली आहे. २२ कोटी १९ लाख रुपयांना या कामाचा ठेका देवकर अर्थमुव्हर्स या कंपनीला देण्यात आला आहे. पावसाळ्यानंतर डांबरीकरणाची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे यावेळी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर पावसाळ्यातील खड्डे भरण्यासाठी २८ लाख रुपयांचा निधीही उपलब्ध करून देण्यात आला असून नविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. खड्डे भरणे आणि रस्ता दुरुस्तीची कामे लवकरच सुरु होणार आहेत अशी माहिती विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे अलिबाग वडखळ महामार्गाचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची चिन्ह दिसत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महामार्गाच्या डांबरीकरणाला पावसाळ्यानंतर सुरुवात होणार आहे. मात्र महामार्गाचे चौपदरीकरणालाही मंजूरी मिळावीयासाठी येत्या शनिवारी दिल्लीत जाऊन आम्ही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहोत. हे काम तातडीने मार्गी लागावे यासाठी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे देखील प्रयत्नशील आहेत. – महेंद्र दळवी, आमदार