अलिबाग : अलिबाग ते वडखळ मार्गावर रविवारी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, पेझारी ते वडखळ दरम्यान दोन्ही बाजूंनी सुमारे ५ ते ६ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. धरमतर पुलावर कोळसा वाहतूक करणारा ट्रक रस्त्याच्या मधोमध बंद पडल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. ३० किलोमीटरच्या अंतर पार करण्यासाठी अडीच तासांचा कालावधी लागत होता.
या अचानक झालेल्या वाहतूक कोंडीचा मोठा फटका शनिवार-रविवारची सुटी घालवून परतणाऱ्या पर्यटकांना बसला. अनेकांना तासनतास वाहनांत अडकून पडावे लागले. वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. वाहनांची गर्दी इतकी वाढली की, पेझारी ते कार्लेखिंड दरम्यानही काही प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली. विशेषतः अलिबाग, काशीद, मुरुड, रेवदंडा परिसरातून परतीचा प्रवास करणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली.
स्थानिक प्रशासन आणि वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, ट्रक हटविण्यास उशीर झाल्याने कोंडी अधिकच वाढली. रविवारच्या परतीच्या गर्दीत या मार्गावर पुन्हा एकदा वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे दिसून आले. बेशिस्त वाहन चालक लेनची शिस्त पाळत नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या अधिकच बिकट झाली होती.
धरमतर खाली पुलावर दुपारी दीडच्या सुमारास कोळसा वाहतूक करणारा ट्रक बंद पडला होता. संध्याकाळी सहा वाजले तरी बंद पडलेला ट्रक बाजूला करण्यात यंत्रणांना यश आले नव्हते. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटू शकली नाही.
