अलिबाग – रुचकर चव आणि औषधी गुणधर्मामुळे अलिबागचा कांद्याला असलेली मागणी सातत्याने वाढत आहे. कांद्याचे लागवड क्षेत्र यंदा 100 हेक्टरने वाढले असून उत्पादन तीन हजार टन वर पोहोचले आहे. राज्यातील इतर कांद्यांच्या तुलनेत या कांद्याला दरही चांगला मिळत असल्याने कांदा उत्पादक सुखावले आहेत.
यावर्षी पावसाचा कालावधी लांबल्याने कांदा बाजारात येण्यास काहीसा उशीर झाला, मात्र लागवड क्षेत्रात झालेली वाढ आणि वाढती मागणी यामुळे उत्पादन आणि उलाढालीत मोठी भर पडली आहे. तालुक्यात यंदा तब्बल ३,१६० मेट्रिक टन पांढऱ्या कांद्याचे उत्पादन झाले असून, त्यातून सुमारे १८ कोटी ९६ लाख रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी तन्मय भगत यांनी दिली. अलिबागचा पांढरा कांदा हा रुचकर चव, टिकाऊपणा आणि औषधी गुणधर्मांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. यंदा या कांद्याची लागवड ३१६ हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली. विशेष म्हणजे, मागील वर्षी हे क्षेत्र २२१ हेक्टर होते, त्यामुळे यंदा तब्बल १०० हेक्टरने वाढ झाली आहे.
तालुक्यातील नेहुली, खंडाळे, कार्ले आणि तळवली या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पांढऱ्या कांद्याची शेती केली जाते. सुमारे ७६५ शेतकऱ्यांनी या पिकातून उत्पादन घेतले असून, सरासरी प्रति हेक्टरी १० मेट्रिक टन उत्पादन नोंदवले गेले आहे. दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारकडून या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळाल्याने त्याच्या ब्रँडिंगला मोठी चालना मिळाली आहे. त्यामुळे बाजारपेठेत अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला वेगळी ओळख निर्माण झाली असून, मागणी सातत्याने वाढत आहे.
शेतकऱ्यांना भरघोस नफा
या हंगामात उत्पादन खर्च वजा जाता एका हेक्टरमागे सरासरी २.५ लाख रुपयांचा नफा मिळत आहे. चांगल्या उत्पादनामुळे आणि दरामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या कांद्याच्या माळा तयार करणे हे काम महिला करतात त्यातून ग्रामीण भागातील महिलांनादेखील चांगला रोजगार उपलब्ध होत असल्याचे शेतकरी समीर भगत यांनी सांगितले.
व्यापारी थेट शेतात
महानगरांमधून या कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी येत आहे. व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन कांद्याची खंरेदी करत असल्याने शेतकऱ्यांना वाहतूक आणि बाजारातील त्रास कमी झाला आहे. सध्या लहान कांद्याला १५० ते २०० रुपये प्रति माळ दर मिळत असून, हंगामाच्या सुरुवातीला हा दर ३०० ते ३५० रुपये इतका होता. यंदा पांढरया कांद्याचे पीक चांगले आले आहे. काढणीची कामे अंतिम टप्प्यात असून काही दिवसांत मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात येईल, वाढलेले लागवड क्षेत्र, मिळालेले भौगोलिक मानांकन आणि बाजारातील चांगली मागणी यामुळे अलिबागचा पांढरा कांदा यंदा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरतो आहे. यात कृषी विभागाचे योगदान मोठे आहे- सतीश म्हात्रे, कांदा उत्पादक शेतकरी
