तालुक्यातील शेतीचे सर्व २९ हजार ९०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचा संकल्प जिल्हय़ाचे पालकमंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केला. निवडणुका संपल्या की राजकारण संपते याचे भान ठेवूनच पुढची वाटचाल करणार आहोत, असे ते म्हणाले.  
धांडेवाडी येथे शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बप्पासाहेब धांडे होते. नामदेव राऊत, अनिल शर्मा, नगर येथील नगरसेविका उषाताई नलवडे, काकासाहेब धांडे, अशोक जायभाय, धनराज कोपनर आदी या वेळी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, कर्जत शहराचे ग्रामदैवत गोदड महाराज देवस्थानचा तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ात समावेश करण्यात येणार आहे. तालुक्यातील कुकडीचे मोठे क्षेत्र अजूनही पाण्यासाठी तहानलेले आहे. ते ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न आहे. कुकडीचे आवर्तनदेखील लवकरच सोडण्यात येणार आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. पाटबंधारेमंत्र्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पुणे येथे बैठक होईल. पूर्वी आपल्याला पाणी देण्यास ज्यांनी विरोध केला, ते आता पाणी मागण्यासाठी माझ्यासमोर बसतील. यात राजकारण करणार नाही, मात्र आता तालुक्यावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. नलावडे, राऊत यांची या वेळी भाषणे झाली.