लातूर जिल्हा बँक निवडणुकीत विरोधकांचे सर्व अर्ज बाद ; आरोप-प्रत्यारोप; भाजपचे ठिय्या आंदोलन

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत कर्जबाकीचे कारण दाखवून विरोधकांचेच सर्व अर्ज बाद करण्यात आले.

प्रदीप नणंदकर, लोकसत्ता

लातूर: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकाच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी भरलेले सर्व अर्ज बाद करण्यात आले आहेत. सत्ताधाऱ्यांनी कटकारस्थानातून केवळ विरोधकांचे अर्ज बाद केल्याचा आरोप करत, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा बँकेत ठिय्या आंदोलन केले. भाजप नेते दमदाटी करत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांच्या वतीने करण्यात येत असून प्रकरण आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत कर्जबाकीचे कारण दाखवून विरोधकांचेच सर्व अर्ज बाद करण्यात आले. छाननीच्या वेळी कागदपत्रे देण्याची तरतूद असतानाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ते स्वीकारले नाहीत त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांना सहाय्य करणाऱ्या सर्वाच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची परवानगी द्यावी या मागणीसाठी भाजप जिल्हाध्यक्ष थेट राज्यपालांकडे तक्रार करणार आहेत. केंद्रीय सहकारमंत्री अमीत शहा यांच्याकडेही घडलेल्या घटनेची सर्व कागदपत्रे सुपूर्द केली जाणार आहेत.

सोमवारी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक हणमंत जाधव यांना जाब विचारून माहिती मागण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड,  प्रदेश सचिव अरिवद पाटील निलंगेकर, प्रदीप पाटील खंडापूरकर, बाबू खंदाडे यासह सुमारे ५० कार्यकर्त्यांनी ठाण मांडले. मात्र संबंधित अधिकारी गायब झाल्याने कार्यकारी संचालकांनी माहिती देण्यास हतबलता व्यक्त केली. बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याचे आ. रमेश कराड यांनी सांगितले. १०० टक्के वसुली देणारी संस्था म्हणून जिल्हा बँकेनेच गौरव केलेल्या संस्थेकडे थकबाकी दाखवण्यात आली. जिल्हा सहकारी बोर्डाचे जिल्हा सहकार विकास अधिकारी एस. एस. देशमुख यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचे उमेदवार बिनविरोध निवडून येण्यासाठी वेगवेगळय़ा संस्थांच्या थकबाकीचे प्रमाणपत्र एकाच जावक क्रमांकानुसार दिली. खोटे व बनावट प्रमाणपत्र तयार केल्याचा आरोप आहे. या कटात सामील झालेल्या विजयकुमार ढगे, जिल्हा बँकेचे संचालक एच. ए. जाधव यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची तक्रार भगवान पाटील तळेगावकर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे.

लातूर जिल्हा बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी ११ ते १८ ऑक्टोबर अशी अर्ज स्वीकारण्याची मुदत होती. २० ऑक्टोबर रोजी छाननी झाली. या निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपाने सर्व १९ जागांवर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उमेदवार उभे केले होते. मात्र सर्व विरोधी उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले. ८ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत संपणार आहे. त्यानंतर बिनविरोध निवडीची घोषणा जाहीर होईल. या निवडणुकीत आ. धीरज देशमुख, आ. बाबासाहेब पाटील यांच्यासह चारजण बिनविरोध निवडले गेले आहेत.

भाजपच्या वतीने आ. धीरज देशमुख, आ. बाबासाहेब पाटील यांच्यावर आक्षेप घेण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेल्या निकालानुसार वित्तीय संस्थेत संचालक असणाऱ्या व्यक्तीला बँकेची निवडणूक लढवता येत नाही असा निकाल दिला गेला. आ. धीरज देशमुख हे इंडोमोबील तर आ. बाबासाहेब पाटील हे सिध्दीशुगरमध्ये संचालक आहेत. त्यामुळे त्यांना उभे राहता येत नाही अशी बाजू भाजपाच्या वतीने मांडण्यात आली. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा आक्षेप फेटाळून लावला.

विरोधक आता आक्रमक झाले असून आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीचा खून केल्याचा आरोप केला आहे. राज्यपालांकडे दिवाळीपूर्वी भेट घेऊन याबाबतीत तक्रार करणार असल्याचे निलंगेकर व कराड यांनी सांगितले. सत्ताधाऱ्यांचा आरोप..जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्रीपती काकडे यांनी राज्यात अग्रेसर असणाऱ्या जिल्हा बँकेला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत आहे. अर्जदारांनी मागणी केल्याप्रमाणे त्यांना बेबाकी पूर्तता करण्यात आली आहे. भाजपा नेत्यांनी अधिकाऱ्यांना दमदाटी करून खोटे प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न दहशत निर्माण केल्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणी बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना अरेरावीची भाषा वापरण्यात आली याबद्दल जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. बँकेचे कार्यकारी संचालक हणमंत जाधव यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: All candidates application rejected of bjp in latur district central co operative bank election zws

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे
ताज्या बातम्या