Eknath Shinde on Uddhav Thackeray : राज्यात निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलाय. प्रचाराचा शेवटचा टप्पा आता काही तासांतच संपेल. सगळ्यांच्या प्रचारांच्या तोफा थंडावतील. मात्र, शेवटच्या टप्प्यांतच आरोप प्रत्यारोप अन् टीका टिप्पण्यांना जोर आला आहे. सोमवारी रात्री शिवाजी पार्कात झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खरपूस टीका केली.
एकनाथ शिंदे म्हणाले, “दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटिक्स एवढाच त्यांचा इंटरेस्ट आहे. म्हणूनच पाच साल घर में आणि निवडणुका आल्या तेव्हा मुंबई खतरे मे असं पालुपद त्यांनी लावलं आहे.”
“मुंबई काय रेल्वेचा डबा आहे का कुठूनही काढला आणि कुठेही लावला. असं होत नाही. आपल्या आया बहिणींचं कुंकू पुसलं गेलं तेव्हा हे लंडनच्या ठंड हवेत बसले होते. तेव्हा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी दौरा अर्थवट सोडून भारतात परतले होते. पण ठाकरेंनी लंडन सोडलं नाही. असं काय आहे तिथे. घबाड आहे. सगळी माहिती माझ्याकडे आहे, पण त्या खोलात मी जाऊ इच्छित नाही”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
काय खाऊन दाखवलं त्याचीही होर्डिंग्ज लावा
करुन दाखवलं म्हणून जशी होर्डिंग्ज लावली आहेत तसं काय खाऊन दाखवलं त्याची होर्डिंग्ज लावा. कोव्हिडमध्ये काम केल्याचं सांगतात, कोव्हिडमध्ये तुम्ही घरी बसला होतात. पीपीई किट घालून आम्ही फिरत होतो. जिथे टेंडर तिथे सरेंडर, जिथे कमिशन नाही तिथे स्थगिती हे यांचं (उद्धव ठाकरे) धोरण आहे अशी टीकाही एकनाथ शिंदेंनी केली. तसंच २० वर्षांपूर्वी तुम्ही एकत्र का आला नाहीत? असा प्रश्न राज आणि उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंना विचारला आहे.
हे लोक विकासाच्या विरोधातले लोक आहेत-शिंदे
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “हे लोक विकास विरोधी आहेत. मुंबईतील पुनर्विकासाच्या कामामुळे यांना खोकला होतो म्हणे. पण वर्षानुवर्ष झोपड्यात राहणारे आणि धोकादायक इमारतीत राहणाऱ्यांपेक्षा यांना खोकल्याचं कौतुक. तुम्ही बंगल्यावर बंगले बांधता आणि गोरगरीबांनी गटाराच्या बाजूला राहायचं. लोकांच्या वेदना जाणून घ्यायला कुणाचा जन्म कुठे झाला हे महत्त्वाचं नाही. सामान्य लोकांसाठी कोण पोटतिडकीने काम करतो हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वेदना कळणार’ असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
