सातारा : सातारा तालुक्याच्या पश्चिमेकडे पावसाने पुन्हा जोर धरला आहे. मागील दोन दिवस उघडझाप करणाऱ्या पावसाने सकाळपासून पुन्हा जोर वाढवला. रात्रभरही अधूनमधून पावसाच्या सरी कोसळतच राहिल्या.

पश्चिमेकडे धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू असल्यामुळे धरणांमधील पाणीसाठा वाढू लागला आहे. सकाळी उरमोडी धरणाचे चारही दरवाजे उघडून २००० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यावर्षी पावसाने खरिपाच्या मशागतीची कामेही त्याने करू दिली नाहीत. त्यामुळे बहुतांश पेरण्या रखडल्या आहेत. शेतकरी चिंतेत आहे. मात्र, पाऊस काही थांबायला तयार नाही. १५ मेपासून यंदा पावसाने सुरुवात केली आहे.

सूर्यदर्शनही अपवादानेच होत आहे. उघडझाप करणारा पाऊस शेतात वापसा येऊ देत नाही. गेले दोन दिवस अधूनमधून पावसाने उघडीप दिली तरी पुन्हा येणाऱ्या पावसाच्या सरी जनजीवन चिंब आणि विस्कळीत करत आहेत. साताऱ्याच्या पश्चिमेकडील महाबळेश्वर, वाई, जावली, सातारा, कराड, पाटण या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धरणातून पाणी सोडल्यामुळे उरमोडी धरण क्षेत्राच्या खालील बाजूस असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे पाण्याची आवक वाढत आहे. हे पाणी नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास हा विसर्ग वाढवण्यात येणार आहे, अशी माहिती उरमोडी धरण कार्यकारी अभियंता गणेश कणसे यांनी दिली.