कर्जत: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कर्जत शहरातील श्रद्धांजली सर्वपक्षीयांनी लावलेले फलक नगरपंचायतने काल, मंगळवारी हटवले. त्याचे तीव्र पडसाद आज, बुधवारी उमटले. आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात संतप्त सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी याचा निषेध करत रस्तारोको आंदोलन केले. जोरदार घोषणाबाजी करत मुख्याधिकारी अक्षय जायभाय यांच्यावर कारवाईची मागणी केली. प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. सभेत काही वक्त्यांनी फलक हटवण्यामागे सभापती राम शिंदे यांचा हात असल्याचा आरोप केला.

अजित पवार यांच्या निधनानंतर श्रद्धांजलीचे फलक शहरात लावण्यात आले होते. नगरपंचायतीने ते हटवले. त्याचे तीव्र पडसाद उमटले. याचा निषेध करण्यासाठी रास्तारोको करण्यात आले. या आंदोलनात जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पप्पू धुमाळ, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष डॉ. नितीन तोरडमल, नितीन धांडे, ऋषिकेश धांडे, रावसाहेब धांडे, अशोक कोठारी, विशाल मेहत्रे, तात्या ढेरे, राजेंद्र लाळगे, अजय भैलुमे आदी पदाधिकारी तसेच नागरिक सहभागी झाले होते.

यावेळी माजी नगराध्यक्ष राऊत म्हणाले, राज्यातील सर्वात कर्तबगार नेता गमावल्याने शोककळा पसरलेली आहे. मुख्य अधिकारी जायभाय यांनी फलकाची विटंबना करून ते काढले. फलक काढण्यामागे मोठे राजकीय षडयंत्र आहे. आमच्या श्रद्धास्थानाला धक्का पोहोचवणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा तीव्र आंदोलन करू. ॲड. बाळासाहेब शिंदे यांनी, निधनाला आठ दिवसही झालेले नसताना श्रद्धांजली फलक काढून तुम्ही राजकारण करत आहात हे योग्य नाही, जिल्हा बँकेच्या स्वतःच्या मालकीच्या जागेत असलेला फलक नगरपंचायतला काढण्याचा अधिकार नाही असे सांगत यामध्ये विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा सहभाग असल्याचा आरोप केला.

बाळासाहेब साळुंके म्हणाले, लोकभावना तीव्र आहेत, मुख्याधिकारी जायभाय यांच्यासमोर नागरिकांचे प्रश्न प्रलंबित आहेऊ, ते सोडवण्याकडे दुर्लक्ष करतात आणि ज्या नेत्याने जनतेसाठी आयुष्य वेचले त्याचे फलक हटविण्याची हिंमत आणि धाडस तुमच्याकडून कुठे येते?, यामागे अनेक शक्ती आहेत.

मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यास दिल्याने अखेर प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी प्रशासकीय पातळीवरून करण्यात येईल व तसा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी तहसीलदार सतवान सावंत, पोलीस निरीक्षक सोपानराव शिरसाट उपस्थित होते.