अलिबाग – जिल्‍हा परीषद आणि पंचायत समिती निवडणूकांसाठी रायगड जिल्‍ह्यात महायुती होण्‍याची शक्‍यता जवळपास संपली आहे. असे असले तरी अलिबाग आणि पेण विधानसभा मतदार संघात शिवसेना भाजपा युतीसाठी अजूनही जोरदार प्रयत्‍न सुरू आहेत. अर्ज मागे घेण्‍याच्‍या मुदतीपर्यंत युती होईल, अशी आशा दोन्‍ही बाजूचे नेते बाळगून आहेत. त्‍यामुळे पुढील दोन तीन दिवसातील तो़डगा निघणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रायगड जिल्‍हा परीषद आणि जिल्‍हयातील १५ पंचायत समितीच्‍या सार्वत्रिक निवडणूकीसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्‍यासाठी उमेदवारी अर्ज भरण्‍याची मुदत बुधवारी संपली. प्रत्‍येक पक्षाने आपापल्‍या कुवतीप्रमाणे उमेदवार उभे केले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्‍याची मुदत २७ जानेवारी पर्यंत असणार आहे.

रायगड जिल्‍हयात शिवसेना शिंदे गटाशी कुठल्‍याही परीस्थितीत जुळवून घ्‍यायचे नाही अशी ठाम भूमिका राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष सुनील तटकरे यांची राहिली आहे. त्‍यामुळे जिल्‍ह्यात महायुती होण्‍याची शक्‍यता केव्‍हांच मावळली आहे. कर्जत खालापूरात राष्‍ट्रवादीने ठाकरेंच्‍या शिवसेनेशी गट्टी केल्‍याने शिवसेना भाजप एकत्र आले आहेत. एकीकडे राष्‍ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपमध्‍ये जागावाटपाची बोलणी सुरू असतानाच दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेचीदेखील खलबते सुरू आहेत.

अलिबाग आणि पेण या दोन विधानसभा मतदार संघात प्रत्‍येकी दहा याप्रमाणे जिल्‍हा परीषदेचे साधारण २० मतदार संघ येतात. यामध्‍ये जागा वाटपाचा तिढा सुटताना दिसत नाही. पेणमध्‍ये जर शिवसेनेला जागा सोडल्‍या तर अलिबागमध्‍ये भाजपाला जागा सोडण्‍याची तयारी शिवसेनेने दाखवली आहे. जागा वाटपात देवाण घेवाण असावी अशी शिवसेनेची भूमिका आहे. भाजपमधील काही नेते यासाठी राजी आहेत. पण कुठल्‍या आणि किती जागा कुणाला सोडायच्‍या यावर अद्याप एकमत होताना दिसत नाही.

भाजपकडून जिल्‍हाध्‍यक्ष धैर्यशील पाटील, महामंत्री सतीश धारप तर शिवसेनेकडून आमदार महेंद्र दळवी यांच्‍यात सातत्‍याने चर्चेच्या बैठका सुरु आहेत. पण तोडगा काही निघतांना दिसत नाही. जागावाटप करताना भविष्‍यात येणाऱ्या सत्‍तेची समीकरणेही बांधली जात आहेत.

अलिबाग मुरूडमध्‍ये भाजपा दोन ते तीन जागांची मागणी करत आहे. तर शिवसेना त्‍याबदल्‍यात पेण पालीमध्‍ये जागा मागत आहे. अलिबाग विधानसभा मतदार संघाचा विचार करता ग्रामीण भागात भाजपाने हातपाय पसरायला सुरूवात केली असली तरी तिरंगी लढतीत उमेदवार निवडून आणण्‍याची क्षमता निर्माण झालेली नाही. त्‍यामुळेच इथं आपलं अस्तित्‍व दाखवायचे असेल तर शिवसेनेसोबत युती केल्‍याशिवाय पर्याय नाही हे अलिबागमधील भाजप नेतृत्‍व जाणून आहे. मात्र हे घडवून आणण्‍यासाठी वरिष्‍ठांचे मतपरीवर्तन करण्‍याचे प्रयत्‍न सुरू आहेत. त्‍यात त्‍यांना कितपत यश येते यावर युतीचे भवितव्‍य अवलंबून आहे.

शिवसेनेबरोबरच भाजपच्‍या उमेदवारांनीही अर्ज दाखल केले आहेत. अलिबाग व पेण मतदार संघात युती व्‍हावी असा आमचा प्रयत्‍न सुरू आहे. त्‍याकरिता भाजपबरोबर चर्चा केली जात आहे. तोडगा निघेल असा विश्वास आहे. – महेंद्र दळवी, आमदार