राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी राज्यसभेसाठी मतदान करण्यात यावे यासाठी ईडीच्या कोर्टात अर्ज दाखल केला आहे. नवाब मलिक यांच्या वकिलांच्यामार्फत न्यायलयात हा अर्ज दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गैरव्यवहार (मनी लाँडरिंग) प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली होती.

अनिल देशमुखांकडूनही अर्ज
अनिल देशमुख यांच्या मार्फतही राज्यसभेसाठी मतदान करण्यात यावे यासाठीचा विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आपलाही अर्ज दाखल करून घेण्यात यावा, अशी मागणी मलिक यांनी केली आहे. राज्यसभेच्या ६ जागांसाठी येत्या १० जूनला निवडणूक होणार आहे. देशमुख आणि मलिक यांनी दाखल केलेल्या अर्जावर ईडी उद्या आपला निर्णय देणार आहे. या दोन्ही अर्जांवर ८ जून रोजी सुनावणी होणार आहे.

ईडीकडून अटक

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी)ने अटक केली होती. ७ मार्चपर्यंत त्यांच्या ईडीच्या कोठडीत वाढ करण्यात आली होती. २५ ते २८ फेब्रुवारी दरम्यान, प्रकृती अस्वास्थेच्या कारणामुळे नवाब मलिक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या तीन दिवसांमध्ये नवाब मलिक यांची चौकशी होऊ शकली नाही. तसेच तपासातून समोर आलेल्या माहितीमुळे मलिकांना ताब्यात घेऊन चौकशी होणे अधिक गरजेचे आहे असे ईडीतर्फे सांगण्यात आले. या मुद्द्यावरुन न्यायालयाने सात मार्चपर्यंत नवाब मलिकांच्या ईडी कोठडीत वाढ केली होती. अनिल देशमुख आणि नवाब मलिक सध्या आर्थर रोड तरुंगात न्यायलयीन कोठडीत आहेत.