कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आज दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत एक फुटाने वाढ झाली आहे. जिल्ह्यातील बहुतेक नद्यांच्या पाणीपात्रामध्ये वाढ झाली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे.
जिल्ह्याला गेली पाच दिवस पावसाने झोडपून काढले आहे. तुलनेने आज पावसाचे प्रमाण कमी होते. सकाळी तसेच सायंवेळी रिमझिम धारा बरसल्या. पण पावसाचे प्रमाण वाढल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढत आहे. आज ती एक फुटाने वाढून १८ फूट झाली.
ऐन मे मध्ये पूर पर्यटन
पंचगंगा नदी काठची मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. मेच्या तिसऱ्या आठवड्यात पूरस्थिती पाहण्यासारखी परिस्थिती झाली आहे. यामुळे शनिवारच्या सुटीची संधी घेत शहरवासीयांनी नदीकाठी गर्दी केली. नदीकाठच्या भागात पाणी साठल्याने वाहनधारकांना त्यातून मार्ग काढावा लागत आहे.
गांधी मैदानाची दुर्दशा
कोल्हापुरातील गांधी मैदानात इतक्या प्रमाणात पाणी साचले आहे की हे मैदान आहे हे सांगून पटणार नाही, अशी दुर्दशा ओढावली आहे. या प्रश्नी या मैदानात बनावट नेता फेकण्याचे आंदोलन झाले होते. त्यावर मैदानात पाणी साचणार नाही असे नियोजन कोल्हापूर महापालिकेकडून तातडीने अपेक्षित होते. आज मात्र येथील पाणी निचरा करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले होते.
झाडे पडल्याने वाहतूक कोंडी
शहराच्या अनेक भागांमध्ये पडझड झाली आहे. पावसाने अनेक भागांत झाडे कोसळलेली आहेत. अशा झाडांच्या फांद्या दूर करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू होते.