रत्नागिरी : गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ वरील आंबा घाट धोक्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. घाटातील रस्त्याला गंभीर स्वरूपाच्या भेगा पडल्याने रस्ता खचण्याचा धोका निर्माण झाला असून, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मनुज जिंदल यांनी आंबा घाटातून सर्व प्रकारच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर पुढील आदेशापर्यंत संपूर्ण बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या मार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. दरम्यान, सततच्या अतिवृष्टीमुळे आंबा घाटातील कि.मी. ६९.५०० ते ६९.६०० या दरम्यान रस्त्याच्या डाव्या बाजूस मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणालगत तब्बल १०० मीटर खोल दरी असल्याने रस्ता खचल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. हा धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तातडीने वाहतूक निर्बंध लागू केले आहेत.

३१ जुलै २०२६ पासून लागू झालेल्या या आदेशानुसार आंबा घाटातून सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. मात्र, अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहने तसेच हलकी प्रवासी वाहने नियंत्रित वेगाने आणि आवश्यक खबरदारी घेऊन या मार्गावरून प्रवास करू शकतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अवजड वाहनांसाठी रत्नागिरी–हातखंबा–पाली–अणुस्कुरा घाट–राजापूर/कोल्हापूर हा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला असून, गरजेनुसार भुईबावडा किंवा फोंडा घाटाचाही वापर करण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.

या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी रत्नागिरी पोलीस अधीक्षकांना आंबा घाटाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला धोकादायक ठिकाणी इशारा फलक, रिफ्लेक्टीव्ह बॅरिकेड्स आणि रात्रीच्या वेळी ब्लिंकर्स बसवण्याचे निर्देश देण्यात आले असून, रस्त्याची दुरुस्ती युद्धपातळीवर पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. आदेशाचे उल्लंघन करून अवजड वाहन घेऊन आंबा घाटातून प्रवास करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहनचालकांवर किंवा संबंधित व्यक्तींवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही प्रशासनाने दिला आहे.