रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील आंबा घाट परिसरात बुधवारी रात्री दरोड्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. बांबावडेकडे बोलेरो वाहनातून म्हैस घेऊन जाणाऱ्या चालकाला दख्खन परिसरात अडवून आठ जणांच्या टोळीने सुमारे २५ हजार रुपयांची लूट केली. या घटनेने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच देवरूख पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली. जलद कारवाई करत अवघ्या काही तासांत पाच संशयितांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. उर्वरित तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
लांजा उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली देवरूखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाची दिशा निश्चित केली. साखरपा दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शांताराम पंदेरे, तसेच पोलीस कर्मचारी सचिन कामेरकर आणि प्रशांत साळुंखे यांनी या कारवाईत सक्रिय सहभाग नोंदवला. या घटनेनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून तपासाची गती वाढवण्याचे निर्देश दिले. फरार आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
