रत्नागिरी : कोकणातून कोल्हापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी आंबा घाट हा आवश्यक पण धोकादायक टप्पा मानला जातो. वळणावळणाचा रस्ता, खोल दऱ्या आणि पावसाळ्यातील जोखमीमुळे हा घाट नेहमीच चर्चेत राहिला आहे. आता मात्र या प्रवासाला सुरक्षित पर्याय उपलब्ध होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग १६६ अंतर्गत आंबा घाटातील सुमारे ७ किलोमीटरचा अवघड टप्पा टाळण्यासाठी तीन बोगदे उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यामध्ये सुमारे ३.५ किलोमीटर लांबीचा मुख्य बोगदा असून, इतर दोन बोगदे लहान स्वरूपाचे असतील. या बोगद्यांमुळे घाटातील धोकादायक वळणांना पूर्णपणे बायपास मिळणार आहे.

मि-या-नागपूर महामार्ग प्रकल्पांतर्गत राबवण्यात येणाऱ्या या कामामुळे कोकण ते विदर्भ दरम्यानची वाहतूक अधिक सुलभ होणार आहे. प्रकल्पाचे सुमारे ९५ टक्के काँक्रीटीकरण पूर्ण झाले असून, उर्वरित कामे वेगाने सुरू आहेत.सुमारे दोन हजार फूट उंचीवर वसलेला आंबा घाट निसर्गरम्य असला तरी अपघातांच्या दृष्टीने संवेदनशील आहे.

पावसाळ्यात दरडी कोसळणे, धुके आणि निसरडा रस्ता यामुळे प्रवास अधिकच कठीण होतो. ऐतिहासिकदृष्ट्या हा घाट कोकण आणि कोल्हापूरला जोडणारा महत्त्वाचा मार्ग राहिला आहे. नव्या बोगद्यांमुळे प्रवासाचा वेळ कमी होईल, सुरक्षितता वाढेल आणि वाहतुकीचा ताण कमी होईल. परिणामी, या मार्गावरील पर्यटन आणि व्यापाराला नवी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.