Ambadas Danve Vidhan Parishad Candidate: महाविकास आघाडीकडून विधानपरिषदेसाठी उद्वव ठाकरे यांच्या नावाची चर्चा असताना ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना दानवे महाविकास आघाडीचे उमेवार असतील असे सांगितले. उद्धव ठाकरे यांनीच याबाबत निर्णय घेतल्याचेही आदित्य यांनी यावेळी स्पष्ट केले. संजय राऊत यांनी देखील एक्सवर पोस्ट करुन आदित्य ठाकरे यांच्या घोषणेला दुजोरा दिला आहे.
दानवेंच्या नावाची आदित्य ठाकरेंकडून घोषणा
विधानपरिषदेसाठी महाविकास आघाडीच्या एका जागेसाठी कोणाची घोषणा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने या जागेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाला पसंती दिली होती. उद्वव ठाकरे यांनी विधानपरिषदेवर जावं अशी आग्रहाची विनंती सुप्रिया सुळे यांनी केली होती. पण, आता उद्वव ठाकरे यांच्या ऐवजी अंबादास दानवे विधानपरिषदेवर जाणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसेच, दानवेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असे त्यांना स्पष्ट केले. दरम्यान, ठाकरेंच्या या घोषणेला काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा असणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
संजय राऊत यांच्याकडूनही माहिती
शिवसेना नेते (उद्धव ठाकरे) आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी देखील आदित्य ठाकरे यांच्या घोषणेनंतर एक्सवर पोस्ट करून दानवे यांनी उमेदवारी दिल्याचे जाहीर केले. अंबादास दानवे हे शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार असतील, उद्या ११ वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करतील, अशी माहिती राऊत यांनी दिली आहे. तसेच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दानवे यांच्या नावाची घोषणा केली, असेही राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केली भूमिका
“राज्यसभेला ठाकरेंच्या शिवसेने शरद पवारांना पाठिंबा दिला होता. त्यावेळी राष्ट्रवादीने विधानपरिषदेसाठी उद्धव ठाकरे यांचे नाव सुचवले होते. पण, आता उमेदवारी कोणाला द्यायची हा त्यांचा निर्णय आहे”, असे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले. “दानवे यांना त्यांनी उमेदवारी दिली असल्यास आम्ही वरिष्ठांशी चर्चा करु पण, आमच्या भूमिकेत बदल होईल असे वाटत नाही”, असे शिंदे म्हणाले. “राज्यसभेप्रमाणे विधानपरिषद देखील बिनविरोध झाल्यास आनंदच होईल”, असेही शिंदे म्हणाले.
