मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १ ऑक्टोबरपासून परदेश दौऱ्यावर जाणार होते. परंतु, हा परदेश दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. १० दिवसांच्या या परदेश दौऱ्यात ते बर्लिन आणि लंडन या शहरांना भेटी देणार आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदेंबरोबर उद्योगमंत्री उदय सामंतही जाणार आहेत. आमदार अपात्रतेप्रकरणी सध्या विधानसभा अध्यक्ष सुनावणी घेत आहेत. त्यामुळेच हा दौरा पुढे ढकलला असल्याचं बोललं जात आहे. परंतु विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे की, आदित्य ठाकरे यांनी या परदेश दौऱ्यावरून प्रश्न उपस्थित केले होते. त्याची सकारला भिती आहे. त्यामुळेच हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.
अंबादास दानवे म्हणाले, “आदित्य ठाकरे यांनी या परदेश दौऱ्याविषयी प्रश्न उपस्थित केले होते. हा दौरा का होतो? कसा होतो? या दौऱ्याचा खर्च कोणाकडून केला जातो? तसेच, हा दौरा कशासाठी होतोय? असे अनेक प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत. आदित्य ठाकरे यांनी हे प्रश्न उपस्थित केले नसते तर हा दौरा झाला असता. हिंदी चित्रपटात एक संवाद आहे. ‘ये डर अच्छा हैं’. ही तशीच परिस्थिती आहे.” अंबादास दानवे टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू असल्याने हा दौरा पुढे ढकलला असल्याचं बोललं जात आहे. त्यावर काय सांगाल? असा प्रश्न यावेळी दानवे यांना विचारण्यात आला. यावर अंबादास दानवे म्हणाले, मला असं वाटत नाही की सुनावणीमुळे हा दौरा पुढे ढकलला असावा, परंतु निश्चितपणे दौरा पुढे ढकलण्यामागे काही ना काही कारण असावं.
हे ही वाचा >> भाजपा उज्ज्वल निकमांना जळगावातून लोकसभेच्या रिंगणात उतरवणार? विद्यमान खासदार उन्मेश पाटील म्हणाले…
मुख्यमंत्र्यांचा परदेश दौरा पुढे ढकलण्यापूर्वी आदित्य ठाकरे काय म्हणाले होते?
आदित्य ठाकरे म्हणाले होते की बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांनी आठवडाभराच्या परदेश दौऱ्याचे नियोजन केले आहे. आपल्या देशाला किंवा राज्याला गुंतवणूक मिळवून देणाऱ्या परदेश दौऱ्यांवर माझा आक्षेप नाहीच, पण हा दौरादेखील त्यांच्या दावोसच्या सहलीसारखा असू नये. दावोसच्या दौऱ्यावर सरकारने २८ तासांसाठी तब्बल ४० कोटी रुपये खर्च केले होते. त्याचबरोबर दावोस दौऱ्याच्या बैठकीचं वेळापत्रक सरकारने जाहीर केलं नव्हतं, दौऱ्याचे फोटो नव्हते, त्याचबरोबर या दौऱ्यावरी खर्चाचे आकडे सरकार अजूनही लपवत आहे. . एखाद्याच्या सुट्टीसाठी दिवसाचे काम एका आठवड्यापर्यंत वाढवू नये. नाहीतर हा दौरा नव्हे तर करदात्यांच्या खर्चाने केलेली सहलच म्हणावी लागेल.