scorecardresearch

“मविआच्या संभाजीनगरमधील सभेत हारतुरे, स्वागत समारंभ नसणार” अंबादास दानवेंची माहिती, म्हणाले, “बाबासाहेबांच्या घटनेचं…”

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महाविकास आघाडीची सभा होणार असून यावेळी उद्धव ठाकरे याणि अजित पवार सभेला संबोधित करतील.

Ambadas Danve
संभाजीनगरमध्ये आज उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज (२ एप्रिल) छत्रपती संभाजीनगर येथे सभा होणार आहे. ही केवळ उद्धव ठाकरे गट नव्हे तर पूर्ण महाविकास आघाडीची सभा असणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातली खेड आणि मालेगावनंतरची ही तिसरी सभा असणार आहे. या सभेची जोरदार तयारी सुरू आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे. यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सभेची तयारी करत आहेत. अंबादास दानवे यांनी आज सकाळी माध्यमांना सभेच्या तयारीसंदर्भात माहिती दिली.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, देशातली धोक्यात असलेली लोकशाही, महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला पळवले जात आहेत, वेगवेगळ्या संस्थांची कार्यालये गुजरातला हलवली जात आहे, या परिस्थितीत या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्या मैदानावर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक वेळा मराठवाड्यातील जनतेला संबोधित केलं. तिथूनच उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस नेते नाना पटोले राज्यातल्या जनतेला मार्गदर्शन करणार आहेत.

दानवे म्हणाले की, राज्यातल्या भाजपा आणि गद्दारांच्या घोषणाबाज सरकारला या सभेतून उत्तर मिळेल. ही संपूर्ण मराठवाड्याची सभा आहे, त्यामुळे मराठवाड्यातून लोक या सभेला येतील. परंतु छत्रपती संभाजीनगरमधील लोकांची संख्या जास्त असेल. या सभेला शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन नेते उपस्थितांना मार्गदर्शन करतील. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार धनंजय मुंडे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे सर्वांना मार्गदर्शन करतील.

हे ही वाचा >> “गीदड की खाल…”, साईबाबांवरील प्रश्नावर धीरेंद्र शास्त्रींचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले, “त्यांना ईश्वराचं स्थान…”

सभेत हारतुरे, स्वागत समारंभ नसणार

अंबादास दानवे यांनी सांगितलं की, आजच्या सभेत, हारतुरे, शाल-सत्कार आणि स्वागत समारंभ होणार नाहीत. या देशातली लोकशाही धोक्यात आहे, त्यामुळे सभेपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेचं पूजन केलं जाणार आहे. तसेच संविधानाचं संरक्षण करण्याची भूमिका घेतली जाणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 10:43 IST

संबंधित बातम्या