Ambadas Danve : राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्यांवरून आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू आहे. असं असतानाच शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर करत राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत १० हजार कोटींचा महाघोटाळा झाला असल्याचा गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. या संदर्भात सखोल चौकशी होऊन वसुली होणार का? असा सवालही अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला विचारला आहे. त्यांच्या या पोस्टची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत आहे.

अंबादास दानवे यांची पोस्ट काय?

शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, “महाराष्ट्राची महालुट! मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत १०,००० कोटींचा ‘महा-घोटाळा’ झाला आहे. NOPL Green, NACOF, IIPL आणि ONIX सारख्या कंपन्यांनी चक्क ‘बनावट बँक गॅरंटी’ देऊन कंत्राटं लाटली? महावितरणचे अधिकारी आणि कंपन्यांचे संचालक (दिव्येश सावलिया, पी. सुरेश बाबू इ.) यांच्या संगनमताने शेतकऱ्यांच्या नशिबी अंधार टाकण्याचा हा प्रयत्न आहे का? EOW कडे ५ गुन्हे दाखल होणे ही नामुष्की आहे”, असे आरोप अंबादास दानवे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये केले आहेत.

Ambadas Danv
अंबादास दानवे यांचे राज्य सरकारवर गंभीर आरोप

तसेच अंबादास दानवे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोस्ट टॅग करत म्हटलं की, “सखोल चौकशी होऊन वसुली होणार का? अधिकाऱ्यांना शासन कोण करणार? अपारंपरिक ऊर्जा खात्याचा कारभार पाहणारे मंत्री यांच्या यातील सहभागाची चौकशी ‘पारदर्शक कारभाराचे पुरस्कर्ते’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार का?”, असा सवाल अंबादास दानवे यांनी केला आहे.

अंबादास दानवेंची सरकारी सुरक्षा काढली

शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते तथा माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची वाय प्लस सुरक्षा गृह विभागाने काढली असल्याची माहिती समोर आली आहे. यावरून खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली.