MNS Chief Raj Thackeray on Balasaheb Thackeray Birth Centenery: बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दीनिमित्ताने राज्य तसेच देशातील अनेक राजकीय नेत्यांनी अभिवादन करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील त्यांचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे दोन फोटो एक्सवर शेअर केले आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदींनी केलेल्या या पोस्टवरून एक वेगळाच वाद पेटण्याची चिन्हे आहेत. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी या पास्टवरून भाजपाला लक्ष्य केले आहे.

अंबादास दानवे काय म्हणाले?

शिवसेना (ठाकरे) पक्षाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती केल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी ‘हिंदूहृदयसम्राट’ बिरुद वापरणे बंद केल्याची टीका भाजपाकडून केली जाते. या टीकेच्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवेंनी पंतप्रधान मोदींच्या पोस्टमध्ये देखील हिंदूहृदयसम्राट हे बिरुद वापरले नसल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.

“एखाद्या पोस्टमध्ये ‘हिंदुहृदयसम्राट’ हे बिरुद लिहिलेले नसेल, तर भाजप भक्तांना अतीव दुःख आणि त्रास होतो. आज पंतप्रधान महोदयांच्या पोस्टमधून माननीय साहेबांचे ‘हिंदुहृदयसम्राट’ हे बिरुद वगळण्यात आले. आता भक्त कोणाला दूषण देणार, कुठे रडारड करणार? कारण त्यांच्या शीर्षस्थ नेतृत्वानेच हा शब्द वगळला आहे!” असे अंबादास दानवे म्हणाले आहेत

​”पक्ष, चिन्ह, नेता आणि आता बिरुद… गोष्टी लंपास करण्याची मालिका सुरूच दिसते!” अशी खोचक टीकाही दानवे यांनी केली आहे.

पंतप्राधान मोदींनी काय पोस्ट केली होती?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली. मोदी म्हणाले की, “महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय परिदृश्यावर खोलवर प्रभाव टाकणारे दिवंगत मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त, या दिग्गज व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण आदरांजली. तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रभावी वक्तृत्व आणि ठाम विचारसरणीसाठी ओळखले जाणारे बाळासाहेब जनतेशी एक अद्वितीय नाते जपून होते. राजकारणाबरोबरच त्यांना संस्कृती, साहित्य आणि पत्रकारितेचीही विशेष आवड होती. व्यंगचित्रकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीत समाजाचे सूक्ष्म निरीक्षण आणि विविध विषयांवरील निर्भय भाष्य दिसून येते. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांच्या दृष्टिकोनातून आम्हाला मोठी प्रेरणा मिळते आणि ती साकार करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू.”