सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी किंमत असलेल्या ‘अंबरग्रीस’ची (ब्लू व्हेल माशाची उलटी) तस्करी करणाऱ्या टोळीला वनविभागाने १६ एप्रिल रोजी सायंकाळी सापळा रचून जेरबंद केले. या कारवाईत ९.१२० किलो वजनाचे अंबरग्रीस जप्त करण्यात आले असून, त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत ७ कोटी रुपये आहे.

शिरोडा परिसरात काही जण बेकायदेशीररीत्या अंबरग्रीसची विक्री करणार असल्याची गोपनीय माहिती वनक्षेत्रपाल सचिन शिडतुरे यांना मिळाली होती. त्यानुसार, उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकाने बनावट ग्राहक तयार करून संशयितांना गाठले. शिरोड्यातील परबगाव येथे रचलेल्या सापळ्यात हे चौघे जण मुद्देमालासह अडकले. या प्रकरणी ​संशयित रणजित रामचंद्र नायर रा. परबगाव, गुरुनाथ नाईक रा. परबगाव, विभव आडारकर रा. शिरोडा,निलेश मनोहर पांडजी रा. रेडी यांना ताब्यात घेऊन अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

​ब्ल्यू व्हेल हा वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार ‘अनुसूची-१’ मधील संरक्षित प्राणी आहे. त्याच्या उपपदार्थांची विक्री करणे हा गंभीर गुन्हा आहे. या प्रकरणी सावंतवाडी वनक्षेत्रपाल फिरते पथक अधिक तपास करत आहे. अशा प्रकारच्या तस्करीची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ वनविभागाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.