​सावंतवाडी: कुडाळ तालुक्यातील पणदूर परिसरात अंबरग्रीसची (व्हेल माशाची उलटी) तस्करी करण्याचा प्रयत्न सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने उधळून लावला. पोलिसांनी सापळा रचून चौघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून २ किलो ३७३ ग्रॅम अंबरग्रीस आणि वाहनांसह २ कोटी ४६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

​कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना एलसीबीच्या पथकाला पणदूर परिसरात अंबरग्रीसची विक्री होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार वनरक्षक, पंच आणि वजनकाटाधारकांच्या उपस्थितीत पणदूर-कडावल रस्त्यावर सापळा रचण्यात आला. यावेळी होंडा युनिकॉर्न मोटारसायकल आणि मारुती सुझुकी एर्टिगा कारमधून आलेल्या चौघांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडे अंबरग्रीस आढळून आले.

​या प्रकरणी संकेत चव्हाण (वय २६, रा. ओरोस, मूळ रा. निरूखे), महेश रेवणकर (वय ३५, सध्या रा. रत्नागिरी, मूळ रा. मालवण), अमेय  देसाई (वय ३१, रा. ओरोस) आणि अमित अणावकर (वय ३९, रा. अणाव, कुडाळ) या चौघांना अटक करण्यात आली आहे.

​जप्त करण्यात आलेल्या २ किलो ३७३ ग्रॅम अंबरग्रीसची बाजारभावानुसार अंदाजे किंमत २ कोटी ३७ लाख ३० हजार रुपये आहे. यासह तस्करीसाठी वापरलेली दोन्ही वाहने असा एकूण २ कोटी ४६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

​एलसीबीचे अमर कांडर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुडाळ पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ मधील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्या सूचनेनुसार आणि एलसीबीचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, हनुमंत भोसले, सुरेश राठोड, विल्सन डिसोजा, आशीष जामदार व अमर कांडर यांच्या पथकाने केली.