सावंतवाडी: सावंतवाडी तालुक्यातील आंबोली परिसरात मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास आलेल्या अचानक आलेल्या पुरामुळे नांगरतास वाडी येथील शेतात काम करणारे काही शेतकरी, महिला आणि ग्रामस्थ नदीपलीकडे अडकून पडले. मात्र, ‘अंबोली रेस्क्यू टीम’ने तातडीने धाव घेत सर्व शेतकऱ्यांची सुखरूप सुटका केली.

​मिळालेल्या माहितीनुसार, आंबोली परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगर उतारावरील पाणी वेगाने नदीत आले. यामुळे नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढली. यावेळी नदीपलीकडील शेतात काम करणाऱ्या ग्रामस्थांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते तिथेच अडकले. त्यांना नदी ओलांडून परतणे अशक्य झाले होते.

​या घटनेची माहिती मिळताच आंबोली रेस्क्यू टीमचे मायकल डिसोझा, उत्तम नार्वेकर, नारायण चव्हाण, राजू राऊळ, सुजित चिल्लू व अन्य ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी लाईफ जॅकेट, सुरक्षा दोर (रोप) व इतर बचाव साहित्याचा वापर करून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बचावकार्य सुरू केले. योग्य नियोजन आणि सावधगिरी बाळगत त्यांनी पुरात अडकलेल्या सर्व शेतकरी व महिलांना सुरक्षितपणे नदीच्या अलीकडच्या तीरावर आणले.

​रेस्क्यू टीमच्या या धाडसी आणि तत्पर कामगिरीमुळे कोणतीही जीवितहानी न होता संभाव्य मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, मुसळधार पावसाची स्थिती पाहता ग्रामस्थांनी नदी-नाल्यांजवळ जाणे टाळावे आणि पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न घेता नदी ओलांडण्याचे धाडस करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.