सावंतवाडी: आंबोली येथील प्रसिद्ध महादेवगड पॉईंट येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या बेळगाव-निपाणी येथील पर्यटकांपैकी एक जण सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. डॉ. आयुब सय्यद (वय ४५, रा. जत्राट, निपाणी, बेळगाव) असे दरीत कोसळलेल्या पर्यटकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. आयुब सय्यद हे आपल्या नऊ सहकाऱ्यांसोबत मंगळवारी सकाळी आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी आले होते. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास डॉ. सय्यद हे लघुशंकेसाठी महादेवगड पॉईंट येथील सुरक्षेचे रेलिंग ओलांडून दरीच्या बाजूला गेले असता, अचानक तोल जाऊन ते थेट खोल दरीत कोसळले. जवळच मक्याची कणसे विकणाऱ्या एका स्थानिक विक्रेत्याने त्यांना दरीत कोसळताना पाहिले आणि तत्काळ त्यांच्या सहकाऱ्यांना ही माहिती दिली.
घटनेची बातमी मिळताच सावंतवाडी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्काळ आंबोली येथील ‘सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू टीम’ला पाचारण केले. मंगळवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत रेस्क्यू टीमच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली. मात्र, परिसरात सुरू असणारा संततधार पाऊस, दाट धुके आणि अंधारामुळे ही मोहीम थांबवावी लागली.
रेस्क्यू टीमच्या माहितीनुसार, सदर व्यक्ती पारपोली येथील सिद्धेश्वर मंदिरापासून सुमारे दोनशे फूट पुढे जंगल भागात कोसळली असण्याची शक्यता आहे. संबंधित व्यक्तीचा मोबाईल वरच राहिल्याने लोकेशनद्वारे शोध घेणे शक्य झाले नाही. आज बुधवारी सकाळी पुन्हा नव्याने शोधमोहीम हाती घेतली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
