​सावंतवाडी: प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या आंबोलीत रविवारी सर्पदंशाने एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, सोमवारी दुपारी सतिचीवाडी येथील एका चिरेखाणीत साचलेल्या खोल पाण्यात बुडून ५० वर्षीय पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. संजय लक्ष्मण गांवकर (वय ५०, रा. इन्सुली) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, माजगाव उद्यमनगर येथील ‘हिंदुस्थान पॉलीमर्स’ कंपनीतील ११ कर्मचारी माजगाव व इन्सुली परिसरातून आंबोली येथे पर्यटनासाठी आले होते. सोमवारी सायंकाळी सतिचीवाडी येथील एका चिरेखाणीत साचलेल्या पाण्यात संजय गांवकर उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात बुडू लागले. सोबतच्या सहकाऱ्यांनी त्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही.

​या दुर्घटनेची माहिती माजी सरपंच शशिकांत गावडे यांनी तातडीने ‘रेस्क्यू टीम’ आणि आंबोली पोलिसांना दिली. माहिती मिळताच ‘सह्याद्री ॲडव्हेंचर आंबोली’ आणि ‘सांगेली रेस्क्यू टीम’चे सदस्य तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रेस्क्यू टीमचे सदस्य अजित नार्वेकर यांनी खोल पाण्यात उतरून संजय गांवकर यांना बाहेर काढले. त्यांना सीपीआर देऊन आणि पोटातील पाणी काढून वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

​या बचावकार्यात अजित नार्वेकर यांच्यासोबत राजू राऊळ, उत्तम नार्वेकर, नारायण चव्हाण, दीपक मेस्त्री, सुजीत नायर, प्रथमेश गावडे, कमलेश गावडे, गिरीश गावडे आणि विराज गावडे यांनी सहभाग घेतला. घटनेची माहिती मिळताच आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार लक्ष्मण काळे यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून, पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

​प्रशासकीय नियोजनाच्या अभावामुळे अपघातांत वाढ:

​पावसाळ्यात आंबोली, चौकुळ आणि गेळे या पर्यटन स्थळांवर महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकासह इतर राज्यांमधून पर्यटक मोठ्या संख्येने येतात. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून केवळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यावर भर दिला जात असून वाहतूक कोंडी आणि पार्किंगबाबत ठोस व्यवस्था केली जात नसल्याचे चित्र आहे. योग्य माहिती व मार्गदर्शनाचा अभाव असल्याने पर्यटक तिन्ही गावांत कुठेही फिरतात, ज्यामुळे अशा दुर्दैवी दुर्घटना घडत आहेत. स्थानिक ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य नियोजन करण्याची मागणी आता जोर धरत आहे.