सावंतवाडी: पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोली येथील महादेवगड पॉईंटवरून सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळून एका पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. डॉ. आयुब सय्यद (वय ४५, रा. जत्राट, निपाणी, जि. बेळगाव) असे मृत पर्यटकाचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर बुधवारी दुपारी रेस्क्यू टीमला त्यांचा मृतदेह खोल दरीतून बाहेर काढण्यात यश आले. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. आयुब सय्यद हे आपल्या नऊ सहकाऱ्यांसोबत मंगळवारी आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी आले होते.
सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास महादेवगड पॉईंट परिसरात असताना ते लघुशंकेसाठी दरीच्या बाजूला असलेल्या सुरक्षेच्या रेलिंगवरून पलीकडे गेले. या दरम्यान अचानक तोल गेल्याने ते थेट ४०० फूट खोल दरीत कोसळले. पॉईंटवरील एका स्थानिक मका कणस विक्रेत्याने ही घटना पाहून तात्काळ त्यांच्या सहकाऱ्यांना कल्पना दिली. घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आणि आंबोली पोलीस ठाण्याचे संतोष गलोले पथकासह घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी तात्काळ ‘सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू टीम’ला पाचारण केले. मात्र, परिसरात सुरू असलेला संततधार पाऊस, दाट धुके आणि अंधारामुळे मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास शोधमोहीम थांबवावी लागली. तसेच संबंधित व्यक्तीचा मोबाईल वरच राहिल्याने लोकेशनद्वारे शोध घेणे शक्य झाले नाही.
बुधवारी पहाटे पुन्हा रेस्क्यू मोहीम हाती घेण्यात आली. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास दरीत मृतदेह आढळून आला. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू ग्रुप (आंबोली-सांगली) आणि पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतर मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला.
या शोधमोहीम व रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू ग्रुपचे बाबल आल्मेडा, मायकल डिसोजा, संतान आल्मेडा, उत्तम नार्वेकर, लॉरेन्स आल्मेडा, राजू राऊळ, प्रथमेश गावडे, पासकु देसा, अजित नार्वेकर, समीर गावडे, आनंद गावडे, विशाल बांदेकर, प्रतीक मोहिते, नारायण चव्हाण, शुभम कळसुलकर, सर्वेश नाईक, मनीष नार्वेकर, वामन पालेकर, राकेश अमरुस्कर, दीपक मेस्त्री, अजित गावडे, रघुनाथ सावंत, अभिजित नार्वेकर व हेमंत नार्वेकर यांनी सहभाग घेतला.
