​सावंतवाडी: आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकाचा सर्पदंश झाल्यानंतर वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. गंगाधर मरपा (वय ३८, रा. हंपी, कर्नाटक) असे मृत पर्यटकाचे नाव आहे. वर्षा पर्यटनाच्या शेवटच्या वीकेंडला आंबोलीत झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका तब्बल अडीच तास अडकून पडल्याने प्रशासनाच्या नियोजनाचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट झाले आहे.

​गंगाधर मरपा हे आपल्या कुटुंबीयांसह आंबोली धबधबा परिसरात पर्यटनासाठी आले होते. मुख्य धबधब्याच्या बाजूला असलेल्या अंधाऱ्या भागात ते असताना त्यांना सापाने चावा घेतला. सर्पदंश झाल्यानंतर त्यांना तात्काळ आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, तेथे पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.

​त्यानुसार रुग्णाला घेऊन रुग्णवाहिका सावंतवाडीच्या दिशेने रवाना झाली. मात्र, पर्यटनाचा श्रावण महिन्याच्या पुर्वीचा  शनिवार-रविवार असल्याने धबधबा परिसर आणि मुख्य रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या प्रचंड वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका तब्बल अडीच तास अडकून पडली. आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर पुढील उपचार न मिळाल्याने अखेर पर्यटकाचा जीव गेला. ​या घटनेमुळे आंबोलीतील पर्यटनाच्या काळात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा आणि आपत्कालीन व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पर्यटन हंगामात गर्दी होणार हे स्पष्ट असतानाही प्रशासनाकडून आपत्कालीन वाहनांसाठी स्वतंत्र ‘इमर्जन्सी कॉरिडॉर’ किंवा पर्यायी मार्ग का ठेवली जात नाही, असा संतप्त सवाल नागरिक व पर्यटकांकडून उपस्थित केला जात आहे. आंबोलीत तातडीच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करणे, गर्दीच्या काळात प्रभावी वाहतूक नियंत्रण करणे आणि आपत्कालीन वाहनांसाठी कायमस्वरूपी मार्ग निश्चित करण्याची मागणी आता जोर धरत आहे.