आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावरुन राजकीय वादंग निर्माण झाला आहे. अभिनेता आमिर खानने ५ जुलैला त्याच्या राहत्या घरी गौरी स्प्रॅट या त्याच्या गर्लफ्रेंडशी तिसरं लग्न केलं. याआधी आमिर खानने रिना दत्ताशी वयाच्या २१ व्या वर्षी लग्न केलं होतं. त्यानंतर १६ वर्षांनी तिला घटस्फोट दिला. आमिर खानने नंतर किरण रावशी लग्न केलं. तिलाही १६ वर्षांनी घटस्फोट दिला. आमिर खानचं तिसरं लग्न म्हणजे लव्ह जिहाद आहे अशी टीका शिवसेना आणि भाजपा नेत्यांनी केली आहे.

मंत्री नितेश राणेंनी नेमकं आमिर खानच्या लग्नाबाबत म्हटलंय?

नितेश राणे म्हणाले आहेत हिंदू धर्माचे तरुण आमिर खानला सेलिब्रिटी मानतात. ते आमिर खानकडून काय प्रेरणा घेणार? याचा विचार त्यांनी केला आहे का? हिंदू समाजाने या बाबत विचार केला पाहिजे. आमिर खान लव्ह जिहादचा ब्रांड अँबेसेडर होतो आहे का? असाच प्रश्न आम्हाला आता पडतो आहे. हिंदू समाजाने, हिंदू तरुणांनी जे यांचे चित्रपट पाहतात त्यांनी विचार करुन अशा लोकांना महत्त्व दिलं पाहिजे आणि मोठं केलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. यापाठोपाठ शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनीही आमिर खानवर टीका केली आहे.

संजय शिरसाट काय म्हणाले?

संजय शिरसाट म्हणाले, “आमिर खान हा एक अभिनेता आहे. त्यांना पाहून लोक त्यांना फॉलो करतात. आमिर खानसारखा माणूस जर तीन तीन लग्नं करत असेल तर समाज त्यांच्याकडून काय आदर्श घेणार? त्यामुळे आमिर खान हा लव्ह जिहादचा ब्रांड अँबेसेडर होऊ शकतो. पण सामान्य माणसाच्या मनातून तो उतरेल यात शंका नाही.” आमिर खानच्या लग्नावर विश्व हिंदू परिषदेनेही टीका केली आहे. हिंदू महिलांशी लग्न करुन मुस्लिम मुलांना जन्म दिला जातो आहे असा आक्षेप विहिंपने घेतला आहे.

विहिंप नेत्यांचं म्हणणं काय?

आमिर खान हा एक सुनियोजित कट आखून हिंदूंना कमकुवत करण्याचं काम करतो आहे. सातत्याने हिंदू मुलींशी लग्न करुन तो हिंदू समाजाला कलंकित करतो आहे. आमिर खानने सुधरावं नाहीर आम्ही त्याला लवकरच धडा शिकवू. कारण लग्न हिंदू मुलींशी करायचं आणि मुस्लिम मुलांना जन्म द्यायचा. हा कुठला नियम आहे? असं विहिंप नेत्यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे आदित्य ठाकरेंनी आमिर खानच्या लग्नावरुन भाजपाला टोला लगावला आहे.

Aamir Khan wife wedding look
आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाची गेले काही दिवस जोरदार चर्चा सुरू होती.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

आमिर खान यांचे बरेच फोटो तर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह आहेत. त्या दोघांची चांगली मैत्री आहे. आमिर खानला पंतप्रधान विचारु शकतात. लव्ह जिहाद वगैरे म्हणत आहेत त्यांनी उत्तर द्यावं की लँड जिहाद उज्जैन मध्ये कुणी केला? तर तो भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे. अयोध्या मंदिरातील दानपेटीतल्या चोऱ्या कुणी केल्या? त्याला कुठला जिहाद म्हणायचं? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला आहे.