Amit Deshmukh in Latur Kavi Sammelan: महाराष्ट्रातील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर त्यांच्यातला एकेक गट सत्ताधारी युतीमध्ये गेला आहे. त्यामुळे पूर्वीच्या एकसंघ अशा या दोन्ही पक्षांचे आमदार पक्षफुटीमुळे आता सत्तेतही आहेत आणि विरोधातही आहेत. या पार्श्वभूमीवर एकीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोप चालूच असताना दुसरीकडे कोपरखळ्या आणि मिश्किल टिप्पणीही पाहायला मिळत आहे. लातूरमध्ये रविवारी पार पडलेल्या कवी संमेलनाच्या कार्यक्रमात अशाच प्रकारच्या कोपरखळ्या पाहायला मिळाल्या. काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी यावेळी केलेल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांवरून तुफान टोलेबाजी केली.

अमित देशमुख यांनी यावेळी आपल्या भाषणाच्या सुरुवातीपासूनच टोलेबाजीला सुरुवात केली. अजित पवार गटाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांचा उल्लेख करताना “सोहळ्याला उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खुर्दचे नेते…”, असं त्यांनी म्हणताच समोर उपस्थित असणाऱ्या श्रोत्यांप्रमाणेच व्यासपीठावरील सर्वच मान्यवर व कवींमध्ये जोरदार हशा पिकला. अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटीलही यावेळी व्यासपीठावरच उपस्थित होते. त्यांनीही अमित देशमुख यांच्या या कोटीवर दिलखुलास दाद दिली.

“खुर्दमधून बुद्रुकमध्ये कधी जाताय, ते बघायचं”

“शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बुद्रुक आहे. तुम्ही फक्त बुद्रुकमधून मुक्कामाला खुर्दमध्ये आले आहात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खुर्दमधून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बुद्रुकमध्ये कधी जाताय, हे बघायचंय. फार काही अडचणीचं नाही”, असं अमित देशमुखांनी विक्रम काळे व बाबासाहेब पाटील यांना उद्देशून म्हणताच पुन्हा एकदा सभागृहात हशा पिकला.

दरम्यान, यावेळी अशाच प्रकारचं कवी संमेलन दुबईमध्ये घेण्याबाबतचाही विषय निघाला. तेव्हा अमित देशमुखांनी हल्लीच्या पक्षांतरांबाबत मिश्किल टिप्पणी केली. “दुबईत मराठी माणसाचा असा सोहळा होईल, तिथे कवी संमेलन होईल आणि तिथे तुम्ही याल. पण विक्रमजी, तुम्ही तिथे याल म्हणून मला दुबईच्या शेखची चिंता आहे. कारण त्याचाही पक्षप्रवेश होऊ शकतो”, असं अमित देशमुख यांनी म्हणताच व्यासपीठावर उपस्थित विक्रम काळे व बाबासाहेब पाटील यांनी त्यांना दिलखुलास दाद दिली.

“आम्ही अनेकांचे डोके ठिकाणावर आणतो, पण आपलंही..”

“या कवी संमेलनाचा आस्वाद घेण्याची आम्हीही आतुरतेनं वाट पाहात होतो. आम्ही पुढारी आहोत. आपण अनेकांचे डोके ठिकाणावर आणत असतो. पण कधी आपलंही डोकं ठिकाणावर आणण्यासाठी कवी संमेलनात हजेरी लावावी लागते”, असा टोला यावेळी अमित देशमुखांनी लगावला. “आम्हाला उगीच असं वाटत असतं की महाराष्ट्र आमच्या पाठीशी आहे वगैरे. पण इथे आल्यानंतर कळालं की नेमका महाराष्ट्र काय आहे? काय विचार करतोय? मला तर कळालंच, पण माझ्यापेक्षा जास्त ते बाबासाहेब पाटलांना आणि विक्रम काळेंना कळालं असेल. समाजातली ही खदखद समजून घेतली पाहिजे”, अशी खोचक टिप्पणी अमित देशमुख यांनी केली.

Amit Deshmukh: अमित देशमुख कुटुंबियांकडे ११ साखर कारखान्यांची मालकी

लातूरमध्ये वेगळी सत्तासमीकरणं?

दरम्यान, अमित देशमुखांनी यावेळी चेष्टेनं केलेल्या विधानांमुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. “इतरांचं मला माहिती नाही, पण हे आमचे मित्र आहेत. परवाच बाबासाहेब पाटलांना आम्ही प्रेमपत्र पाठवून दिलं आहे. आता त्याचं काय उत्तर ते देतात हे माहिती नाही”, असं अमित देशमुख म्हणाले. तसेच, “विक्रम काळे, बाबासाहेब पाटील यांच्या भेटीगाठी आता दुर्मिळ झाल्या आहेत. पण आज त्यांची गाठ पडली. त्यांनी मला सांगितलं की लातूरबद्दल काही चिंता करू नका, आम्ही तुमच्या बरोबर आहोत”, असं सूचक विधान त्यांनी करताच उपस्थितांमध्ये पुन्हा हशा पिकला.