Amit Satam Dia Mirza Video Controversy: “आमचा कोणत्याही व्यक्तीला जात, धर्म, प्रांत आणि भाषेच्या आधारावर आक्षेप नाही. भारतविरोधी शक्तींना समर्थन देणाऱ्यांवर आमचा आक्षेप आहे”, अशी भूमिका भाजपाचे आमदार अमित साटम यांनी मांडली आहे. अभिनेत्री दिया मिर्झाने दिवाळी सणानिमित्त प्रदूषणासंदर्भात दिलेल्या संदेशाचा व्हिडीओ मुंबई महानगरपालिकेने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून हटवला. त्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. भाजपाच्या नेत्यांच्या भूमिकेमुळे मुंबई मनपाने व्हिडीओ हटवला, अशी टीका विरोधकांनी केली. तसेच मुंबई उच्च न्यायालयानेही त्यावर आक्षेप घेतला. यानंतर अमित साटम यांनी ही नवी भूमिका मांडली.

मुंबई उच्च न्यायालयाने दिया मिर्झाचा व्हिडीओ हटवल्यानंतर नाराजी व्यक्त करत ‘भारत हा धर्मनिरपेक्ष देश असल्याची जाणीव राजकीय नेत्यांनी ठेवायला हवी’, अशा शब्दांत सुनावले. यानंतर शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनासह महापौर रितू तावडे यांच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टीका केली.

महानगरपालिकेनेच स्वतः अभिनेत्री दिया मिर्झा, माधुरी दीक्षित आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांना पत्र पाठवून प्रदूषण जनजागृतीसाठी असे व्हिडीओ तयार करण्यास सांगितले होते. मात्र, त्यानंतर दिया मिर्झा यांचा व्हिडीओ नेमका कोणाच्या आदेशाने हटवण्यात आला, असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.

अमित साटम काय म्हणाले?

विरोधकांच्या टीकेनंतर आमदार अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. सर्वात आधी अमित साटम यांनीच दिया मिर्झाच्या व्हिडीओवर आक्षेप घेतला होता. आम्ही दिवाळी कशी साजरी करायची? याचे धडे दिया मिर्झाकडून घेण्याची गरज वाटत नाही, असे ते म्हणाले होते. यानंतर आजच्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, “तुकडे तुकडे गँगशी ज्यांची सहानुभूती आहे किंवा भारतामध्ये अराजकता पसरविणाऱ्यासंबंधी ज्यांना सहानुभूती वाटते. या मुद्द्यावर आमचा काही लोकांबद्दल आक्षेप आहे आणि तो राहिल.”

मुंबई उच्च न्यायालयाने दिया मिर्झाचा व्हिडीओ पुन्हा शेअर करण्यात यावा, असे सांगितले आहे, असाही प्रश्न साटम यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, न्यायालयाने दिलेले निर्देश नेमके काय आहेत? याची मला कल्पना नाही. पण महापालिकेला वाटले म्हणून तो व्हिडीओ पोस्ट केला गेला, त्यांना वाटले म्हणून त्यांनी डिलीट केला. यावरचे स्पष्टीकरण प्रशासन देऊ शकेल. पण जे लोक हँडल चालवतात, तेच हे ठरवू शकतात.

“भविष्यात मुंबई महानगरपालिका किंवा कोणत्याही संस्थेने कोणत्या लोकांना आपल्या मोहिमेत सामील करून घ्यायला हवे, याचा व्यवस्थित गृहपाठ करायला हवा. तसे झाले तर या प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत”, असाही सल्ला अमित साटम यांनी दिला.

मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर भाष्य केले आहे.  “व्हिडीओ डिलीट केला ही मुंबई मनपाची मर्जी. ज्यांचे सोशल मीडिया हँडल आहे, त्यांना त्यावर काय ठेवायचे आणि काय काढायचे, याचे अधिकार आहेत. त्यांनी त्याप्रमाणे ते केले आहे. अभिनेत्री दिया मिर्झा या चांगल्या प्रथितयश अभिनेत्री असतील पण त्या काही भारताच्या खूप मोठ्या नेत्या नाहीत. हा आमच्या स्तरावरचा विषय नाही. हा छोट्या स्तरावरचा विषय आहे”, असे सांगून त्यांनी हा प्रश्न त्यांना विचारणे संयुक्तिक नसल्याचे सुचवले.