Amit Shah Praises Harshvardhan Patil For work in Cooperative Sector : केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे साखर उद्योग परिसंवाद हा कार्यक्रम आज (शनिवार, १० ऑगस्ट) पार पडला. यावेळी राष्ट्रीय दक्षता पुरस्कार २०२२-२३ चं वितरणही करण्यात आलं. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री व भाजपा नेते हर्षवर्धन पाटील हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाला संबोधित करताना अमित शाह यांनी देशाचं सहकार क्षेत्र कसं वाढत चाललं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने साखर उद्योगाचा किती वाटा आहे, याबद्दलची माहिती दिली. देशभरात होणारं उसाचं व साखरेचं उत्पादन, त्याबरोबरचे इतर जोडधंदे आणि यातून होणारा सहकार क्षेत्राचा विकास सर्वांसमोर मांडला. यावेळी शाह यांनी हर्षवर्धन पाटील यांचं कौतुक केलं. महाराष्ट्रात होणारी इथेनॉल निर्मिती, केंद्राकडून त्याची होणारी खरेदी, याबाबत हर्षवर्धन पाटील सातत्याने पाठपुरावा करत असतात. असं शाह यांनी सांगितलं. शाह म्हणाले, तुम्हा सर्व साखर उत्पादकांचे ते (पाटील) नेते आणि वकील दोन्ही आहेत. अमित शाह म्हणाले, दोन वर्षांपूर्वी आपण देशात ३८ कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती करत होतो. मात्र आता आपल्या देशातील सर्व साखर कारखाने मिळून ३७० कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती करत आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात चलन आपल्या देशाला मिळत आहे. त्याच्या मोठा हिस्सा आपल्या शेतकऱ्यांच्या खिशात जातो आहे. हे पैसे आपण पूर्वी आखाती देशांना देऊन त्यांच्याकडून पेट्रोल व डिझेल विकत घेत होतो. मात्र इथेनॉलची निर्मिती वाढू लागल्यामुळे पेट्रोल व डिझेलची आयात कमी झाली आहे. परिणामी पर्यावरण सुधारण्यास हातभार लागत आहे. इथेनॉलची निर्मिती वाढल्यामुळे आपले शेतकरी समृद्ध होऊ लागले आहेत. साखर कारखाने नफ्यात आहेत. सहकारमंत्री म्हणाले, इथेनॉलच्या निर्मितीमुळे साखर उद्योगाला बहुआयामी फायदा झाला आहे. या सर्व प्रक्रियेचा मी एक भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सर्व बाबींवर सातत्याने लक्ष ठेवून असतात. आमच्या मंत्र्यांचा एक समूह तयार करण्यात आला आहे. आम्ही दर तीन महिन्यांनी एक बैठक घेतो. देशात होणारी इथेनॉलची निर्मिती, पेट्रोल-डिझेलच्या किमती, इथेनॉलची बाजारातील किंमत पाहून निर्णय घेत असतो. नुकतीच जी-२० बैठक पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या बैठकीला गेले होते. त्या बैठकीत त्यांनी बायोफ्यूलचा मुद्दा मांडला आणि एका ग्लोबल बायोफ्यूल अलायन्सची स्थापना केली. त्याचं मुख्यालय गुरुग्राममध्ये आहे. या माध्यमातून नरेंद्र मोदी आपल्या देशाला बायोफ्यूल कॅपिटल बनवण्याचं स्वप्न पाहत आहेत. हे ही वाचा >> Raj Thackeray : “अजित पवारांनी कधी जातीचं राजकारण केलं नाही”, राज ठाकरेंची स्तुतीसुमने; म्हणाले, “मी खात्रीशीरपणे सांगतो…” हर्षवर्धन पाटलांबाबत काय म्हणाले? अमित शाह म्हणाले, आपला हर्षवर्धन (पाटील) बिचारा… मला भेटतो तेव्हा माझी कॉलर पकडतो… आणि म्हणतो आमचं इथेनॉल खरेदी करा. तो तुमचा वकील व नेता दोन्ही आहे. मी त्यांना सांगतो, दोन वर्ष धीर बाळगा. त्यानंतर तुम्ही जितकं इथेनॉल बनवाल, जितका ऊस पिकवाल, त्यातून निर्माण होणाऱ्या इथेनॉलची आपण जगभरात निर्यात करू. मोदींनी त्यासाठीचा मार्ग तयार केला आहे आणि ही आपल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.