अलिबाग : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत किल्ले रायगडावर शिवबा पुण्यतिथी सोहळा पार पडला. मात्र या कार्यक्रमापेक्षा रायगडमध्ये त्यांनी तटकरे कुटुंबीयांच्या घरी घेतलेल्या पाहुणचाराचीच चर्चा रायगडात रंगली.
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे अमित शहा यांच्या सुतारवाडी दौऱ्यावरून शिवसेनेच्या गोटात प्रचंड अस्वस्थता होती. मात्र शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, प्रफुल्ल पटेल यांच्यासह सुतारवाडी येथील तटकरे यांच्या ‘गीता बाग’ या निवासस्थानी जाऊन पाहुणचार घेतला. नंतर ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले.
खास मराठमोळ्या पद्धतीचे जेवण
अमित शहा यांच्यासाठी खास मराठमोळ्या पद्धतीचे जेवण तयार करण्यात आले होत. ज्यात आमरस पुरी, उकडीचे मोदक, मिसळ, पुरणपोळी, काजूगरांची भाजी अशा कोकणी आणि वालाचे बिरडे अशा पदार्थांचा समावेश होता.
शहा हे शिव पुण्यतिथी सोहळ्यासाठी रायगड वर आले होते मात्र राजकीय वर्तुळात चर्चा होती ती तटकरेंच्या घरी झालेल्या पाहुणचाराचीच….
राजकीय हेतू नव्हता – तटकरे
तटकरे यांची ‘डिनर डिप्लोमसी’ रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा वाद मिटवणार का आणि जिल्ह्याला हक्काचा पालकमंत्री मिळणार का याकडे आता रायगडकरांचे लक्ष लागले आहे. मात्र सुनील तटकरे यांनी अमित शाह यांची भेट ही स्नेहपूर्वक होती त्यामागे कुठलाही राजकीय हेतू नव्हता असे स्पष्ट केले.