“राज ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत”, असं साकडं मनसे नेते अमित ठाकरेंनी पुण्यात गणपतीच्या चरणी घातले. नाशिकचा कायापालट करणारे राज ठाकरे राज्याचाही उत्तम विकास करु शकतील असा आशावाद अमित ठाकरेंनी व्यक्त केला. तर, मंत्री भरत गोगावलेंनी अमित ठाकरेंची इच्छा योग्य असली तरी त्यासाठी विधिमंडळात १४५ चे बहुमत लागते अशी प्रतिक्रिया दिली. संजय राऊतांनी देखील यावर बोलताना, “राजकारणात बहुमत फार चंचल असते”, असे मत नोंदवले.
पुण्यात गणपती दर्शनाला आलेले अमित ठाकरे नेमकं काय म्हणाले?
अमित ठाकरेंनी पुण्यातील गणशोत्सव पाहण्यासाठी हजेरी लावली होती. अमित यांनी पुण्यात गणपती दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्रात ज्या काही अडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात हे मागणं देवाकडे मागितले असं अमित ठाकरे म्हणाले. आणि हे एकच व्यक्ती करु शकते, ते म्हणजे राज ठाकरे. लोकांच्या अडचणी दूर व्हाव्यात, शेतकरी, महिला असो किंवा विद्यार्थी. कालही एक आत्महत्या झाली, पेपरफुटीचा विषय आहे. ४८ मिनिटांना सरासरी एक शेतकरी आत्महत्या करत आहे. सरासरी आठ लोकं ट्रेनमधून पडून मरतायेत. याकडे कोणी लक्ष देत नाही, असा आरोप अमित ठाकरेंनी केला.
नाशिकचा दाखला
अमित ठाकरेंनी यावेळी नाशिक शहराचा दाखला दिला. “नाशिकमध्ये सांगितली त्यापेक्षा अधिक कामं केली. शून्य भ्रष्टाचाराचा आरोप हा वेगळी आहे. शून्य पैसे खाल्ले, या पलिकडे सीएसआर फंडातून पैसे आणून लोकांसाठी कामं केली. एक व्यक्ती शहराला मिळाल्यावर एवढं करु शकते तर, राज्याला मिळाल्यावर काय करु शकते”, असे अमित ठाकरे म्हणाले. “दुष्काळाबाबत बोलताना, सर्वांना दिसतंय ते सरकारला का दिसत नाही?:, असं सवाल उपस्थित केला. सरकारने प्रत्यक्ष पाहणी करावी असेही आवाहन केले.
मंत्री भरत गोगावलेंनी दिली प्रतिक्रिया
अमित ठाकरेंच्या वक्तव्यावर मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “त्यांची चूक काय आहे? प्रत्येक मुलाला वाटते आपले वडील कोण तरी व्हावेत, पण त्यासाठी आमदार निवडून यावे लागतात. आता त्यांचा एकही आमदार सभागृहात नाही. पूर्वी १३ होते, त्यानंतर एक आणि आता शून्य आहेत. त्यांना वाटत असेल त्यांनी २८८ पैकी बहुमतासाठी १४५ आमदार लागतात त्याची त्यांनी तयारी करावी आणि नंतर मागणी करावी”, असे गोगावले पुण्यात पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
संजय राऊतांनी दिले उद्धव ठाकरेंचे उदाहरण
अमित ठाकरेंनी तसं साकडं घातलं असेल तर, त्याप्रमाणे पक्षाची बांधणी आणि दिशा ठरवावी लागेल. अमित ठाकरेंना देखील त्याप्रमाणे पुढे जावं लागेल. मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा बाळगणे अयोग्य नाही. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले, उत्तम प्रकारे काम केले पण, कट कारस्थानं करुन त्यांना घालवण्यात आलं. ठाकरेंचा घोडा अडवायचा हे एकमेव धोरण भाजपा आणि शिंदे गटाचे आहे पण, हा घोडा असा अडवला जाणार नाही, असे संजय राऊत म्हणाले. बहुमताच्या अटीबाबत बोलताना, “२०२९ मध्ये आम्ही एकत्र आहोत. बहुमत फार चंचल असते, २०१९ मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असे कोणाला वाटलं होतं? फक्त मला वाटतं होतं”, असेही राऊत पुढे म्हणाले.
