मुंबईमधील ताडदेव परिसरातील एका इमारतीमध्ये विक्रीसाठी असलेल्या फ्लॅटची जाहिरात करताना एका प्रॉपर्टी एजंटने केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद पेटला होता. ‘मांसाहार करणाऱ्यांना घर मिळणार नाही’ अशा आशयाची जाहिरात प्रॉपर्टी एजंट भावेश कावरेने केली होती. या जाहिरातीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भावेश कावरेने स्पष्टीकरणही दिलं होतं. मात्र, या जाहिरातीनंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
यानंतर आज भावेश कावरे याने मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान अमित ठाकरे यांनी भावेश कावरेला खडेबोल सुनावल्यानंतर अखेर भावेश कावरे याने माध्यमांशी संवाद साधत मुंबईकरांची माफी मागितली आहे. ‘कोणतेही कारणं न देता तू सर्वांची माफी मागाची’, अशा शब्दांत अमित ठाकरे यांनी सुनावल्यानंतर भावेश कावरेने माफी मागितली आहे. तसेच या बैठकीदरम्यान अमित ठाकरे हे भावेश कावरेवर संतापल्याचेही पाहायला मिळाले.
अमित ठाकरे काय म्हणाले?
“शाकाहारी लोकांसाठी ही बिल्डिंग आहे असं कोण बोललं? ते फक्त फ्लॅटसाठी नव्हतं, मी तो संपूर्ण व्हिडीओ पाहिला आहे. तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो. या गोष्टी तुला कळायल्या पाहिजेत. तुझ्या घरच्यांनाही काय वाटलं असेल? लोक आता मुंबईवर आणि मुंबईतील अडचणींवर फोकस करायला लागलेत. तिकडे तू लोकांना असं भरकटवण्याचं काम करतो? लोकांमध्ये तणाव निर्माण करण्याचं काम करतो? का? थोड्याशा पैशांसाठी आणि प्रसिद्धीसाठी? सोड ना ते पैसे. तुला हे कळायला पाहिजे ना. आता तू हे सगळं कव्हरप करण्याचा प्रयत्न करतोय, यापेक्षा तू हेच आधीच केलं असतं तर मलाही बरं वाटलं असतं”, अशा शब्दांत अमित ठाकरे यांनी भावेश कावरेला खडसावलं.
“मी तुम्हाला सांगतो, मुंबईत खूप अडचणी आहेत. अशा परिस्थिती तुम्ही विषय दुसरीकडे भरकटवण्याचा प्रयत्न करू नका. मी देखील आमच्या सर्व मनसैनिकांना सांगितलं होतं की कुठेही धर्मावर किंवा जातीवर जाऊ नका. जो व्यक्ती हे बोलला, फक्त त्यावरच बोला. अन्यथा आमची रस्त्यावर खूप ताकद आहे. तुला तुझ्या चुका आता तरी कळल्यात का? तू जे बोलला आहे ते अतिशय चुकीचं आहे. त्यावर तू जे स्पष्टीकरण दिलं आहे ते देखील मला आवडलेलं नाही. माझ्यासह तू सर्व मुंबईकरांना दुखवलं. तू आज सर्वांची, तेही कोणतंही कारण न देता माफी मागायची”, असं म्हणत अमित ठाकरे यांनी भावेश कावरेला सुनावलं.
अखेर भावेश कावरेनी मागितली माफी
अमित ठाकरे यांची भेट घेतली, भेटीत काय चर्चा झाली? पत्रकारांनी विचारलेल्या या प्रश्नावर बोलताना भावेश कावरेनी म्हटलं की, “मी दोन शब्दांत सांगतो की, माझ्या त्या शब्दांमुळे जर मुंबईकरांचं मन दुखावलं असेल, तर मुंबईकरांची माफी मागतो. मी माझ्या त्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण याआधी दिलेलं आहे. त्यामुळे आता या विषयावर अधिक काहीही बोलायचं नाही. अमित ठाकरे यांनी देखील मला हेच सांगितलं की त्या एका वाक्यामुळे मुंबईकरांचं मन दुखावलं गेलं. त्यामुळे मी आता मुंबईकरांची आणि सर्वांचीच माफी मागत आहे. मला वाद वाढवायचा नाही”, अशी प्रतिक्रिया भावेश कावरेनी दिली.
नेमका वाद काय आहे?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये प्रॉपर्टी एजंट भावेश कावरे याने ताडदेव येथील एका आलिशान इमारतीतील फ्लॅटची जाहिरात करताना एका अटीचा उल्लेख केला होता. “तुम्ही मांसाहार करत असाल, तर तुम्हाला इथे घर मिळणार नाही. फक्त शाकाहारी व्यक्तींनाच हा फ्लॅट मिळेल,” असं विधान केलं होतं. यानंतर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. मुंबईसारख्या शहरात घर खरेदी करताना व्यक्तीच्या खानपानाच्या सवयींवरून होणाऱ्या भेदभावाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. दरम्यान, वाढता वाद आणि सोशल मीडियावरील तीव्र प्रतिक्रिया लक्षात घेऊन भावेश कावरेने आपल्या सोशल मिडिया अकाउंटवरून तो वादग्रस्त जाहिरातीचा व्हिडीओ डिलीट केला केला होता.
