Amit Thackeray MNS Tamil Nadu NEET Resolution: तमिळनाडू विधानसभेत नीट परीक्षा रद्द करून बारावीच्या गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश देण्याचा ठराव नुकताच मंजूर झाला. या निर्णयाचे स्वागत करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक विस्तृत पोस्ट लिहून महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना धडा घेण्याचा सल्ला दिला. “महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर!” असे म्हणत अमित ठाकरेंनी या सरकारने आधी स्वतःचा अहंकार बाजूला ठेवला पाहिजे आणि विरोधकांना डावलण्याची वृत्ती सोडली पाहिजे, असे मत मांडले.

तमिळनाडू विधानसभेतील राजकीय एकजुटीचे कौतुक

आपल्या पोस्टमध्ये अमित ठाकरे यांनी तमिळनाडू विधानसभेतील राजकीय एकजुटीचे कौतुक केले. ते म्हणाले, “तामिळनाडूत डावे पक्ष असोत की इतर विरोधी पक्ष, सर्वांनी आपापले झेंडे, राजकीय मतभेद आणि ईगो बाजूला ठेवून विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी या निर्णयाला पाठिंबा दिला. भाजपाच्या एका आमदाराचा अपवाद वगळता सर्वांनी एकत्र येत जनतेच्या प्रश्नांवर राजकारण कसे बाजूला ठेवायचे, याचे उत्तम उदाहरण दाखवून दिले आहे.”

राज ठाकरेंच्या भूमिकेचे दाखला

महाराष्ट्र सरकारने हा निर्णय वर्षांपूर्वीच घ्यायला हवा होता, असे नमूद करत अमित ठाकरेंनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भूमिकेची आठवण करून दिली. “राजसाहेबांनी २०१६ मध्येच ठणकावून सांगितले होते की, ‘नीट’ ही परीक्षा मुळात निरुपयोगी असून ती महाराष्ट्रातील ग्रामीण व मराठी विद्यार्थ्यांचा बळी घेण्यासाठी आणली गेली आहे. मात्र, तत्कालीन आणि सध्याच्या सत्ताधाऱ्यांना कोणाचेही ऐकायचे नव्हते,” असा आरोप त्यांनी केला.

राजकीय परिस्थितीवर टीका

महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर ताशेरे ओढताना अमित ठाकरे म्हणाले, “इथे सत्ताधाऱ्यांना सत्तेची आणि बहुमताची अशी नशा चढली आहे की, त्यांना जनतेशी उत्तरदायित्व उरलेले नाही. MPSC असो, TET पेपरफुटी असो, तलाठी भरतीतील घोटाळे असो की शाळा-कॉलेजांमधील मूलभूत सुविधांची दुरावस्था… विरोधक म्हणून आम्ही जेव्हा काही मांडतो, तेव्हा त्याला केवळ ‘राजकीय विरोध’ म्हणून धुडकावले जाते. सत्ताधाऱ्यांच्या या राजकीय अहंकारामुळे महाराष्ट्रातील लाखो तरुण-तरुणींचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे.”

मनसेची भूमिकाही केली स्पष्ट

मनसेची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, “आम्ही निव्वळ विरोधासाठी विरोध करणारे राजकारणी नाही आहोत. उद्या सरकारने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या, तरुणांच्या किंवा मराठी माणसाच्या हिताचा खरोखर चांगला निर्णय घेतला, तर आम्ही सर्वात आधी सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू.” शेवटी सत्ताधाऱ्यांना इशारा देताना अमित ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रात समाजकारण उरलेच नाही, फक्त सत्ताकारणाचा आणि दडपशाहीचा खेळ सुरू आहे, असे जनतेला वाटू देऊ नका. आता तरी तमिळनाडूकडून धडा घेऊन एकत्र येण्याची हिंमत दाखवा. कारण, महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर.”