Amit Thackeray On NEET : नीट (NEET) परीक्षा पेपरफुटीच्या प्रकरणावरून सध्या देशात मोठा गदारोळ सुरू आहे. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली. आता रद्द झालेली नीटची ही परीक्षा पुन्हा २१ जून रोजी घेण्यात येणार आहे. दरम्यान, नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या प्रकरणात सीबीआयकडून कारवाई करण्यात येत असून आतापर्यंत काही संशयितांना सीबीआयने अटक केलं असून चौकशी सुरू आहे. मात्र, नीट परीक्षा पेपरफुटीच्या प्रकरणावरून आता केंद्र सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी एक्स या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. नीट परीक्षा पेपरफुटीनंतर ही परीक्षा रद्द करण्यात आल्याने काही विद्यार्थ्यांनी नैराश्यातून स्वत:चं आयुष्य संपवल्याच्या घटना घडल्या आहेत. यावरूनच अमित ठाकरे यांनी संताप व्यक्त करत म्हटलं की, ‘ही आत्महत्या नाही, तर सिस्टीमने केलेला खून आहे. तसेच आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून या शिक्षण माफियांच्या मुसक्या आवळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही’, असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.

अमित ठाकरे काय म्हणाले?

“नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) भोंगळ आणि भ्रष्ट कारभारामुळे आज देशातील आणि महाराष्ट्रातील २२ लाख विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात लोटलं गेलं आहे. NEET-UG २०२६ ची परीक्षा रद्द झाल्याच्या धक्क्यातून राजस्थान, दिल्ली, गोवा, उत्तर प्रदेश अशा राज्यांतून प्रामाणिक विद्यार्थ्यांनी नैराश्यातून आपलं आयुष्यच संपवलं, ही आत्महत्या नाही, तर या सिस्टीमने केलेला अधिकृत ‘खून’ आहे”, असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.

“वर्षानुवर्षे डोळ्यात तेल घालून, दिवस-रात्र एक करून अभ्यास करायचा, आई-वडिलांनी शेतजमीन विकून किंवा कर्ज काढून क्लासेसची फी भरायची आणि परीक्षेच्या दिवशी या शिक्षण माफियांच्या मेहेरबानीमुळे पेपर फुटतो? आणि त्यावर उपाय काय तर परीक्षा रद्द? यापेक्षा अजून किती खालची पातळी गाठणार आहे सरकार?”, असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.

“या संपूर्ण घोटाळ्याचे धागेदोरे जेव्हा आपल्या महाराष्ट्राशी जोडले जातात, तेव्हा खरंच लाज वाटते. सीबीआय तपासातून समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. लातूरचे मूळ रहिवासी असलेले आणि चक्क एनटीएच्या (NTA) पेपर सेटिंग पॅनेलमध्ये समाविष्ट असलेले प्राध्यापक पी.व्ही.कुलकर्णी यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यात आपल्या राहत्या घरी विशेष कोचिंगच्या नावाखाली त्यांनी मूळ प्रश्नपत्रिका आणि उत्तरे कोट्यवधी रुपयांना विकली. पुण्यातून सुरू झालेलं हे रॅकेट नाशिक, अहिल्यानगर, जयपूर ते थेट हरियाणामधील गुरुग्रामपर्यंत पसरलं आहे. १५ ते २० लाखांना एक-एक पेपर विकला गेला. म्हणजेच, ज्यांच्याकडे पैसा आहे ते डॉक्टर बनणार आणि जो प्रामाणिकपणे ६५० गुण मिळवण्याची क्षमता ठेवतो, त्याने आत्महत्येचा मार्ग निवडायचा?”, असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.

“या शिक्षण माफियांच्या आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याची हिम्मत नाहीये का या सरकारमध्ये? केवळ परीक्षा रद्द करून आणि नवीन तारीख देऊन विद्यार्थ्यांचा मनस्ताप कमी होत नसतो. या संपूर्ण रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांवर आणि दलालांवर अशी कठोर कारवाई झाली पाहिजे की, पुन्हा कोणत्याही विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचं धाडस होणार नाही. प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील अश्रू आणि त्यांच्या पालकांचा आक्रोश वाया जाणार नाही. ज्या शिक्षण संस्थांनी आणि प्राध्यापकांनी या पवित्र क्षेत्राला कलंकित केलंय, त्यांच्या संपत्तीवर टाच आणली पाहिजे. हा लढा केवळ एका परीक्षेचा नाही, तर या देशातील गुणवत्तेचा आणि प्रामाणिकपणाचा आहे. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि या शिक्षण माफियांच्या मुसक्या आवळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, हा आमचा निर्धार आहे”, असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.

‘नीट’ची २१ जून रोजी फेरपरीक्षा होणार

वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी ‘नीट-यूजी’ परीक्षा प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे रद्द करण्यात आली होती. मात्र आता २१ जून रोजी फेरपरीक्षा घेणार असल्याची घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी केली. पेपरफुटीप्रकरणी सरकारकडून चूक झाल्याची कबुलीही प्रधान यांनी दिली. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी पुढील वर्षापासून या परीक्षापद्धतीत मोठे बदल केले जाणार असून ही परीक्षा पूर्णपणे ऑनलाइन घेतली जाईल, अशी घोषणाही शिक्षणमंत्र्यांनी केली. यंदाच्या ‘नीट-यूजी’ची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणाने देशभर संतापाची लाट उसळली असून, सुमारे २४ लाख विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे.

‘नीट पेपरफुटी प्रकरणातील एकाही दोषीला सोडणार नाही’

‘एनटीए’मधील एखाद्या व्यक्तीचा या घोटाळ्यामध्ये सहभाग असू शकतो, या शक्यतेवर सर्व अंगाने ‘सीबीआय’ सखोल चौकशी करत आहे. ‘सीबीआय’ ही विश्वासार्ह संस्था आहे. या घोटाळ्यातील सत्य बाहेर येईल, एकाही दोषीला सोडणार नाही, असं शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं आहे. दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरण उघड झाल्यानंतर मानसिक धक्का बसून काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. या घटनांबद्दल, ‘‘त्या मुलांच्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी शब्द अपुरे आहेत,’’ अशा भावना प्रधान त्यांनी व्यक्त केल्या.