सध्या गणेशोत्सव सुरू असून राज्यभरात उत्सवाचं वातावरण आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेते मंडळी गणेश मंडळांना भेटी देत आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज पुण्यातील गणेशोत्सवाला हजेरी लावली होती. मात्र, या दरम्यान अमित ठाकरे यांचा संवेदनशीलपणा पाहायला मिळाला आहे.
लहान मुलांच्या अंगाला सिल्वर रंग लावून भीक मागणाऱ्या लहान मुलांचा एक व्हिडीओ अमित ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच हा प्रकार त्वरित थांबवण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. लहान मुलांना सिल्वर रंग लावून महापुरुषांच्या रुपात उभं केलं जात असल्याचा हा प्रकार थांबला पाहिजे, अशी भावनिक पोस्ट अमित ठाकरे यांनी केली आहे. तसेच यासाठी अमित ठाकरे यांनी मनसैनिकांना महत्वाचं आवाहन केलं आहे.
अमित ठाकरे काय म्हणाले?
“गणेशोत्सव सुरू आहे, सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. पण या सगळ्यात रस्त्यावर एक गोष्ट पाहायला मिळत आहे. लहान-लहान मुलांच्या अंगाला सिल्वर केमिकलचे रंग लावून त्यांना देव किंवा महापुरुषांच्या रुपात उभं केलं जात आहे, त्यांच्याकडून भीक मागून घेतली जात आहे. हे अतिशय भीषण आहे”, असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.
“माझं सर्व महाराष्ट्र सैनिकांना आणि नागरिकांना आवाहन आहे की, ती लहान मुलं आहेत, निष्पाप आहेत. त्यामुळे आसपास असं काहीही दिसलं तर ते तिथल्या तिथे थांबवा. त्या कुटुंबाला जी काही मदत हवी असेल ती आपण आपल्या परीने करू. मी स्वतःसुद्धा त्यांच्या पाठीशी उभा राहीन. पण लहान मुलांचं असं शोषण अजिबात होऊ देऊ नका. हे चित्र आपल्याला बदलायचंच आहे. जिथे असं दिसेल तिथे ही गोष्ट त्वरित थांबवा”, असं आवाहन अमित ठाकरे यांनी केलं.
“राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत”; अमित ठाकरेंचं गणरायाला साकडं
“राज ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत”, असं साकडं मनसे नेते अमित ठाकरेंनी पुण्यात गणपतीच्या चरणी घातलं आहे. नाशिकचा कायापालट करणारे राज ठाकरे राज्याचाही उत्तम विकास करु शकतील असा आशावाद अमित ठाकरेंनी व्यक्त केला. अमित ठाकरेंनी पुण्यातील गणशोत्सव पाहण्यासाठी हजेरी लावली होती. अमित ठाकरे यांनी पुण्यात गणपती दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
महाराष्ट्रात ज्या काही अडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात हे मागणं देवाकडे मागितलं असं अमित ठाकरे म्हणाले, आणि हे एकच व्यक्ती करु शकते, ते म्हणजे राज ठाकरे. लोकांच्या अडचणी दूर व्हाव्यात, शेतकरी, महिला असो किंवा विद्यार्थी. कालही एक आत्महत्या झाली, पेपरफुटीचा विषय आहे. ४८ मिनिटांना सरासरी एक शेतकरी आत्महत्या करत आहे. सरासरी आठ लोकं ट्रेनमधून पडून मरतायेत. याकडे कोणी लक्ष देत नाही, असा आरोप अमित ठाकरेंनी केला.
