महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आज मुंबईत मेळावा पार पडला. या मेळाव्याला राज्यभरातील विविध जिल्ह्यातून मनसैनिकांनी हजेरी लावली होती. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्यासह मनसेचे आदी नेते उपस्थित होते. या मेळाव्यात बोलताना अमित ठाकरे यांनी राज्यातील आणि देशातील विविध मुद्यांवर भाष्य केलं.
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरून अमित ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. मात्र, अमित ठाकरे हे भाषण करत असताना अचानक भाषण विसरले. भाषण करत असताना अमित ठाकरे काही वेळ गोंधळल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर ‘मला खरंच काही सुचत नाहीये. थांबा, मी येतो परत’, असं म्हणत अमित ठाकरे हे व्यासपीठावरून निघून गेले. मात्र, काही वेळाने पुन्हा व्यासपीठावर आले आणि पुन्हा अमित ठाकरे यांनी जोरदार भाषण केलं.
नेमकं काय घडलं?
अमित ठाकरे मेळाव्यात बोलताना म्हणाले की, “थोड्या घोषणा द्या, म्हणजे मला भाषण आठवेल. ज्या-ज्या विद्यार्थ्यांनी आंदोलन करून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेतला, त्यांचं पहिल्यांदा कौतुक करतो. मी तुम्हाला जेन्यूअनली (प्रामाणिकपणे) सांगतो, मी जर राज ठाकरे यांचा मुलगा नसतो, तर मी राजकारणात आलोच नसतो. मी हे मुद्दाम सांगतो, दरवेळी सांगत असतो. राज ठाकरे हे माझे वडील आहेत म्हणून नाही किंवा ते राजकारणात आहेत म्हणून नाही. पण राज ठाकरे हे अतिशय प्रामाणिक माणूस आहेत. मी हे देखील छातीठोकपणे सांगतो की जर तुमच्या सारखे प्रामाणिक कार्यकर्ते मला मिळाले नसते, तर मी राजकारणात टिकलो नसतो.”
“मला तुम्हाला प्रामाणिकपणे सांगायचं आहे की आपले आतापर्यंत अनेक आंदोलन झाले. मला जेव्हा राज ठाकरे यांनी पक्षात पद दिलं, त्यानंतर आपण राज्याचा दौरा केला. मला असं वाटतं की आपले आतापर्यंत झालेले आंदोलन आणि दौरे आता तुम्ही विसरले पाहिजेत. आपण आतापर्यंत काय-काय काम आणि कोणते आंदोलनं केले, हे मला तुम्हाला येथे सांगायचं नाही. कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मला माहिती आहे की आपण कोणत्याही आंदोलनात आपल्याला यश मिळेपर्यंत थांबलो नाहीत. मात्र, आतापर्यंत जे आंदोलनं झाली आहेत, ते आपण विसरलो पाहिजेत आणि आपण पुढे गेलो पाहिजे. कारण राज्याची राजकीय परिस्थिती बदलली आहे. आपल्याला पुढे जायचं आहे. आता मी भाषण विसरायला लागलोय. तुमच्या सर्वांच्या उत्साहामुळे मी भाषण विसरायला लागलोय. आता मला खरंच काही सुचत नाहीये. थांबा, मी येतो परत”, असं म्हणत अमित ठाकरे हे व्यासपीठावरून निघून गेले.
