Amit Thackeray On Abhijeet Dipke: “सोनम वांगचुक यांना माझा पाठिंबा आहे पण, अभिजीत दिपकेंना माझा पाठिंबा नाही”, असे मत मनसे नेते अमित ठाकरेंनी नीट पेपरफुटीविरोधात दिल्लीत जंतर मंतरवर सुरु असणाऱ्या आंदोलनाबाबत मांडले. एक माणूस म्हणून माझे मत मांडत असून, पक्ष म्हणून राज ठाकरे भूमिका मांडतील, असेही अमित यांनी स्पष्ट केले. आंदोलनाचे गांभीर्य घालवल्याचा आरोप यावेळी अमित ठाकरेंनी मुंबईत माध्यमांशी बोलताना केला.

आंदोलनाचे गांभीर्य घालवल्याचा आरोप

“सोनम वांगचुक उपोषण करत आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांच्यासमोर नृत्य केले जात आहे, नाटकं केली जात आहेत हे योग्य नाही. सुरुवातीला आंदोलन सुरु केल्यानंतर मला ते खूप आवडलं होतं, धर्मेद्र प्रधान यांचा राजीनामा व्हायलाच हवा. पण, ज्या पद्धतीने या आंदोलनाचे गांभीर्य घालवले ते मला पटलं नाही”, असे मत अमित ठाकरेंनी मांडले. “सोनम वांगचुक आज १७ दिवस उपोषण करत आहेत. सोनम यांना माझा पाठिंबा आहे पण सीजेपीला माझा पाठिंबा नाही”, असे अमित ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले. “२१ मिलियनचे (फॉलोअर्स) प्रेशर आलंय का?”, असा प्रश्न देखील अमित यांनी दिपकेंना यावेळी विचारला.

सोनम वांगचुक यांच्या मागे उभं राहण्याचे आवाहन

“दिपके देशासाठी रस्त्यावर उतरले असतील तर ते दिसलं पाहिजे तुम्ही नाटकं करु शकत नाही, नाचू शकत नाही”, असे अमित ठाकरे म्हणाले. “२० जणांचा मृत्यू झाला असून, हे आंदोलन गांभीर्याने व्हायला हवं. दोन कोटीपैकी एक लाख लोक पण तिथे आले नाहीत.” अभिजीत दिपकेंनी आंदोलनाचे गांभीर्य घालवले असा आरोप करताना देशातील जनतेने सोनम वांगचुक यांच्या मागे उभं राहण्याचे आवाहन अमित ठाकरेंनी केले. पक्ष म्हणून भूमिका मांडत नसल्याचेही अमित यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

वांगचुक यांचे बरेवाईट झाल्यास?

“आंदोलन अशा पद्धतीने वाया जायला नको, सरकार कोणत्याही पद्धतीने लक्ष देत नाही, जबाबदारी स्वीकारत नाही”, असे अमित ठाकरे पुढे म्हणाले. “काँग्रेसच्या काळात अगोदर असं दिसत नव्हतं, कोणतरी दखल घेण्यासाठी जात होते”, असे मत ठाकरेंनी मांडले. “सोनम वांगचुक यांचे काही बरेवाईट झाल्यास पंतप्रधानांपासून सर्वांना जबाबदार धरले पाहीजे”, असेही ठाकरेंनी मत नोंदवले.