Amol Kolhe : अजितदादा पवारांचं २८ जानेवारीला विमान अपघातात निधन झालं. २८ जानेवारीच्या या घटनेनंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या संदर्भात चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र शरद पवार यांच्या गटाकडूनच यासंदर्भात दावा केला जातो आहे. अजितदादा पवार यांच्या गटाचे नेते मात्र विलीकरणाच्या मुद्याला बगल देत आहेत. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मीडियाशी बोलताना आपली बाजू मांडत विलीकरणाच्या मुद्यावर आपले मत मांडले आहे.
काय म्हटलं आहे अमोल कोल्हेंनी?
पवार कुटुंबाने राजकारण आणि कौटुंबिक संबंध यांच्यामध्ये कधीही गल्लत केलेली नाही. अजितदादांच्या मृत्यूबाबत अनेकांना अनेक संशय व्यक्त केले आहेत. रोहित पवारांनी जे प्रश्न विचारलेत त्याची उत्तरं मिळणं गरजेचं आहे. वैमानिक सकाळी ६.३० वाजता ट्रॅफिकमध्ये कसा काय अडकला होता? मुंबईत असा कुठला भाग आहे जिथे वाहतूक कोंडी झाली होती. पायलटचं लोकेशन काय होतं? रोहित पवारांनी महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत. ब्लॅक बॉक्स संदर्भात रोहित पवारांनी जी शंका उपस्थित केली तसंच स्टेटमेंट समोर आलं इथे संशयाचं धुकं दाट होतं. विमानाची कंपनी, कंपनीचा इतिहास एटीसी यांचं काय संभाषण झालं होतं? हे समोर येणं गरजेचं आहे. रोहित पवारांनी महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. याची उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्राच्या मनात अनेक प्रश्न राहणार आहेत. असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.
अजित पवारांचा मृत्यू होऊन २० दिवस झाले तरीही चौकशी अहवाल आलेला नाही-अमोल कोल्हे
मी कुणावरही संशय घेत नाहीये, पण प्रश्न उपस्थित करतो आहे. अजित पवारांसारखा इतका मोठा नेता गेला आहे. त्यांच्या बाबतीत नेमकं काय घडलं हे जाणून घेण्याची प्रत्येकाला आहे. त्यामुळे जे प्रश्न समोर आले आहेत त्याची उत्तरं मिळणं गरजेचं आहे असंही अमोल कोल्हेंनी म्हटलं आहे. या सगळ्याचा तपास करण्यासाठी जे योग्य असेल ते केलं जावं. अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू होऊन २० दिवस झाले तरी चौकशी अहवाल येत नाही हे दुर्दैवी आहे. आमदार रोहित पवार हे काही प्रश्न उपस्थित करीत आहेत, त्यात काही तरी तथ्य असेल ना ? पण सगळी चौकशी ही झालीच पाहिजे.त्यांच्या पक्षातील नेते या विमान अपघाताच्या चौकशीच्या संदर्भात का बोलत नाहीत ? हे त्यांना तुम्ही विचारा असाही प्रति सवालही अमोल कोल्हेंनी केला आहे. टीव्ही ९ मराठी ला दिलेल्या मुलाखतीत अमोल कोल्हेंनी हा प्रश्न विचारला आहे.

