सोलापूर : बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पत्नी सूनेत्रा पवार यांना उभे करायला नको होते. त्यात चूक झाली, अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर त्यावर  प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘ रामकृष्ण हरी ‘ एवढेच शब्द वापरले. तर दुसरीकडे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मात्र अजित पवार यांच्यावर कवितेच्या माध्यमातून खोचक टीका केली. कुणीतरी म्हणालं असं व्हायला नको होतं..पक्ष आणि चिन्ह चोरताना हे मन कुठं गेलं होतं ? अशा शब्दात डॉ. कोल्हे यांनी अजित पवार यांना फटकारे लगावले.

सोलापूर जिल्ह्यात करमाळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची शिव स्वराज्य यात्रा दाखल झाल्यानंतर तेथे आयोजित सभेत खासदार डॉ. कोल्हे यांनी महायुती सरकारच्या कारभारावर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडली. यावेळी माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील आणि माजी आमदार नारायण पाटील हे उपस्थित होते.

हेही वाचा >>>Ashok Chavan : अशोक चव्हाणांची मुलगी श्रीजया यांना भाजपाचं तिकीट? मुलीच्या उमेदवारीवर केलं मोठं विधान; म्हणाले, “मी तिच्यासाठी…”

अजित पवार यांनी चूक कबूल केल्याच्या संदर्भात भाष्य करताना खासदार डॉ. कोल्हे यांनी उपरोधात्मक शब्दांत कविता सादर केली.

कुणी तरी म्हणालं असं व्हायला नको होतं

पक्ष आणि चिन्ह चोरताना हे मन कुठं  गेलं होतं ?

साहेबांच्या काळजावर वार करताना तेच मन निर्ढावलं होतं

मग अचानक कसं वाटलं यावेळी असं व्हायला नको होतं

पराभव दिसला , जनतेनं झिडकारलं की गुलाबी जाकिट तोकडं पडलं

म्हणून म्हणालं वाटतं, माझं चुकलं

पण महाराष्ट्राचा इतिहास सांगतो , अशा चुकीला माफी नाही

महाराष्ट्राची जनता अशा गद्दारांना जागा देणार नाही..

हेही वाचा >>>Ladki Bahin Yojana : “लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात”, भाजपा आमदाराने दिली माहिती; तुम्हीही लगेच तपासा!

प्रत्येक शब्दातून अजित पवार यांच्यावर तुटून पडत असताना खासदार कोल्हे यांना सभेत मोठी दाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. करमाळ्याचे अजितनिष्ठ अपक्ष आमदार संजय शिंदे हे ‘ मामा ‘ या टोपण नावाने परिचित आहेत. करमाळ्याची जनता कोणी कितीही पैशाचा पाऊस पाडला तरी कोणाचा अजिबात ‘ मामा ‘ बनणार नाही, अशा शब्दात डॉ. कोल्हे यांनी आमदार संजयमामा शिंदे यांचा समाचार घेतला.

सोलापूरचे सर्व ११ आमदार..

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी यावेळी बोलताना, आगामी विधाधसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सर्व ११ आमदार महाविकास आघाडीकडूनच निवडून येतील. शरद पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, सुशीलकुमार शिंदे आणि उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील राजकीय चित्र बदलणार आहे, असा विश्वास व्यक्त केला.