महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या सेनेतील सहा खासदारांनी शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला. त्यानंतर ठाकरे सेनेचे आमदार सचिन अहिर यांनीही शिंदेंच्या सेनेचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’ची अद्यापही मोठी चर्चा सुरू आहे. या चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे ‘ऑपरेशन तुतारी’च्या चर्चा रंगल्या आहेत.
या घडामोडी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते तथा खासदार अमोल कोल्हे यांनी एक मोठं वक्तव्य केलं होतं. ‘महायुतीमधून ऑफर आल्यास विचार करू’, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं होतं. तसेच देश पातळीवर देवेंद्र फडणवीस यांची ‘इन्फ्रा मॅन’ म्हणून प्रतिमा कौतुकास्पद वाटते अशी स्तुतीसुमने अमोल कोल्हे यांनी उधळली होती. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं.
खासदार अमोल कोल्हे यांनी आता त्यांनी महायुतीच्या ऑफरबाबत केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘माझं वक्तव्य हे फक्त रेल्वेच्या प्रश्ना संदर्भातील होतं. पण माझ्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला’, असं स्पष्टीकरण अमोल कोल्हे यांनी दिलं आहे.
अमोल कोल्हे काय म्हणाले?
महायुतीच्या ऑफरबाबत तुम्ही बुधवारी एक वक्तव्य केलं होतं, त्यानंतर चर्चांना उधाण आलं होतं. त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर अमोल कोल्हे म्हणाले की, “काल एका पत्रकार परिषदेत बोलत असताना एका पत्रकारांनी मला प्रश्न विचारला की राजाभाऊ वाजे आणि अमोल कोल्हे भाजपात गेल्याशिवाय पुणे-नाशिक रेल्वे होणार नाही का? असा त्यांचा प्रश्न होता. पण पुणे-नाशिक रेल्वेबाबत आमची सातत्याने मागणी आहे. हीच मागणी संगमनेर, जुन्नर, अकोला, मंचर अशा सगळ्यांची आहे. त्यामुळे याबाबतच बोलताना मला एका पत्रकाराने विचारलं की तुम्ही भाजपात गेल्याशिवाय ही रेल्वे होणार नाही का? त्या प्रश्नावर माझा त्यांना प्रतिप्रश्न असा होता की, अशी काही ऑफर आहे का? जर तशी काही ऑफर रेल्वेच्या संदर्भात आली तर विचार करू. त्यामुळे माझं वक्तव्य फक्त रेल्वेच्या संदर्भात होतं. पण रेल्वेच्या संदर्भातील माझ्या वक्तव्याचा काही जणांनी वेगळा अर्थ काढण्याचा प्रयत्न केला”, असं स्पष्टीकरण अमोल कोल्हे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिलं आहे.
“आम्ही सर्व खासदार ठामपणे एकत्र…”
“राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष हा एकत्रच आहे, एकत्रच राहील. आम्ही सर्व खासदार एकसंघ आहोत. मी एका वाक्यात सांगतो की, शरद पवार बांधतील ते तोरण आणि सांगतील ते धोरण. त्यामुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व खासदार ठामपणे एकत्र आहोत”, असं स्पष्टीकरण अमोल कोल्हे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिलं आहे.
