“राष्ट्रवादीमध्ये काम करणाऱ्याला हा अधिकार…”; नथुराम गोडसेच्या भूमिकेवरून अमोल कोल्हेंना घरचा आहेर

अमोल कोल्हे यांनी आपल्या आगामी चित्रपटात महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांचा Why I Killed Gandhi हा माहितीपट येत्या ३० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. पण हा चित्रपट प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हं दिसत आहेत. कारण या चित्रपटात अमोल कोल्हे हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत दिसत आहेत. यावरून आता टीकाटिप्पण्यांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी या प्रकरणी स्पष्ट भूमिका घेतली आहे.

‘मी गांधीजींचा वध केला’, असं वक्तव्य अमोल कोल्हे चित्रपटाच्या प्रोमोमध्ये बोलताना दिसत आहेत. या चित्रपटावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी ‘न्यूज 18 लोकमत’ला प्रतिक्रिया देताना आपली भूमिका मांडली आहे. अमोल कोल्हे यांची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासी संलग्न अशीच हवी, असं मत अंकुश काकडे यांनी व्यक्त केलं आहे. ते म्हणाले, “अमोल कोल्हेंनी अशा प्रकारची भूमिका करणं हे कलाकार म्हणून त्यांना पटत असलं तरी एखाद्या पक्षाचा पदाधिकारी म्हणून काम करताना आपली काही जबाबदारी असते. कलाकार हा राजकीय, धार्मिक, सामाजिक या सगळ्यांपेक्षा वरचढ असतो हे मान्य केलं तरी ज्यावेळेला आपण एखादा पक्षाचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो, त्यावेळेला आपली जबाबदारी असते. त्या पक्षाच्या विचारधारेशी सुसंगत अशीच आपली वागणूक असली पाहिजे”.

अंकुश काकडे पुढे म्हणाले, “अमोल कोल्हे आज एका पक्षात खासदार म्हणून काम करतात. अशावेळी त्यांची ही भूमिका योग्य नाही. त्यांची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेसशी संलग्न अशीच असावी. अर्थात त्यांनी वैयक्तिकरित्या काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. तरी महात्मा गांधींचा ज्याने खून केला त्याची भूमिका करणं हे कोणत्याही भारतीयासाठी योग्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खासदार म्हणून काम करणाऱ्या माणसाला तसा अधिकार निश्चित नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. मी माझी योग्य ती भूमिका त्यांच्यापर्यंत निश्चित पोहोचवेन. त्यांना तो चित्रपट प्रदर्शित न करण्याची विनंती करेन”.

या विषयी अमोल कोल्हेंचं मत काय?

“२०१७ साली या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. ज्यावेळी कोणत्याही सक्रिय राजकारणात नसताना मी ही भूमिका साकारली होती. एखादी भूमिका करतो म्हणजे त्या विचारधारेसोबत सहमत असतो असे कलाकार म्हणून कधीच नसते. काही विचारांसोबत आपण सहमत असतो. तर काही विचारधारांसोबत सहमत नसतानाही आपण ती भूमिका करतो. माझ्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यातसुद्धा नथुराम गोडसेचे उदात्तीकरणाच्या संदर्भात मी कधीही भूमिका घेतलेली नाही. केवळ एक कलाकार म्हणून भूमिका साकारणे आणि त्याचा राजकीय विचारांसोबत संबंध जोडला जाणे या दोन विभिन्न गोष्टी आहेत,” असे अमोल कोल्हे यांनी एबीपी माझासोबत बोलताना सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Amol kolhe new movie nathuram godse role ncp spokesperson ankush kakde vsk

Next Story
एलॉन मस्कच्या मदतीला आदित्य ठाकरे गेले धावून; वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहित केली ‘ही’ मागणी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी