scorecardresearch

‘सावरकर गौरव यात्रे’वरून खासदार अमोल कोल्हेंचं भाजपा-शिंदे गटावर टीकास्र; म्हणाले, “अशी यात्रा काढल्याने…”

सावरकरांचा इतिहास आणि त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाची माहिती देण्यासाठी ३० मार्चपासून राज्यातील २८८ मतदार संघात सावरकर गौरव यात्राही काढण्याची घोषणा भाजपा शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.

amol kolhe
संग्रहित छायाचित्र

सावरकरांचा इतिहास आणि त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाची माहिती देण्यासाठी ३० मार्चपासून राज्यातील २८८ मतदार संघात सावरकर गौरव यात्राही काढण्याची घोषणा भाजपा शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. दरम्यान, या यात्रेच्या आयोजनावरून विविध राजकीय प्रतिक्रिया येत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी या यात्रेवर टीका केली आहे. सावरकर गौरव यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधींच्या प्रश्नांची उत्तर मिळत असतील तर आम्ही या यात्रेचं स्वागत करू असे ते म्हणाले. कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “नेहरू-गांधी कुटुंबातील तरुण नेत्यास खुनशी पद्धतीने बेघर करणं…”; राहुल गांधींवरील कारवाईवरून ठाकरे गटाचा मोदी सरकारवर हल्लाबोल!

काय म्हणाले अमोल कोल्हे?

“राहुल गांधींनी मागच्या संसदेच्या अधिवेशनादरम्यान काही प्रश्न मोदी सरकारला विचारले होते. त्या प्रश्नांची उत्तरं अद्यापही देशाला मिळालेली नाहीत. जर सावरकर गौरव यात्रा काढून त्या चार प्रश्नांची उत्तरं मिळत असतील, तर अशी यात्रा नक्कीच काढावी”, अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली. “सावकरांच्या साहित्यांचा जागर हा प्रत्येकाने करावा. प्रत्येकाच्या मनात सावरकरांविषयी आदर असावा. सावरकर गौरव यात्रा काढल्याने त्यांच्या साहित्याचा जागर होईल, पण या यात्रेने राहुल गांधींच्या प्रश्नांची उत्तरं मिळत असतील, तर त्या यात्रेचं नक्कीच स्वागत करू”, असेही ते म्हणाले.

“सावरकर अनेकांचे प्रेरणास्थान”

“प्रत्येक मराठी माणसाला स्वातंत्रवीर सावरकरांविषयी आदर आहे आणि तो असणं स्वाभाविक आहे. आपल्या साहित्य वाचनाची सुरुवात ‘काळं पाणी’ या पुस्तकाने झाली आहे. सावरकर हे अनेक क्रांतिकारकांची ते प्रेरणा राहिले आहेत”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

हेही वाचा – “बाळासाहेबांच्या सभेलाही जमली नव्हती, तेवढी गर्दी आम्ही जमवली”, तानाजी सावंतांच्या दाव्याची चर्चा!

“महापुरुषांचा राजकीय वापर होऊ नये”

दरम्यान, शिंदे सरकार सावकरांच्या अपमानानंतर यात्रा काढते. मात्र, भगतसिंग कोश्यारींना जेव्हा महारुषांचा अपमान केला, तेव्हा अशी यात्रा का काढली नाही, अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. याबाबत विचारलं असता, “जेव्हाही महापुरुषांचा अपमान झाला, तेव्हा आम्ही त्याचा कठोर शब्दात निषेध केला. खरं तर कोणत्याही महापुरुषांचा राजकीय वापर केल्यापेक्षा त्यांच्या विचारांचा जागर होणं गरजेचं आहे. त्यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 09:06 IST

संबंधित बातम्या