Amol Mitkari demands SIT probe into Ashok Kharat Aghori Puja case: नाशिकमधील स्वयंघोषित भोंदू ज्योतिषी अशोक खरातच्या बाबतीत रोज नवनवीन खुलासे होत आहेत. अशोक खरातच्या श्री शिवनिका संस्थान ट्रस्टवर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर विश्वस्त असल्यामुळे त्यांच्यावरही टीका होत आहे. भोंदू अशोक खरातविरुध्द एका महिलेने अत्याचाराची तक्रार केल्यानंतर त्याचे बिंग फुटले. या प्रकरणावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात दोन गट पडले असल्याचे दिसत आहे. एका गटाने चाकणकर यांची बाजू सावरून धरली आहे. तर रूपाली ठोंबरे पाटील आणि अमोल मिटकरी यांनी या प्रकरणावरून गंभीर आरोप केले आहेत. मिटकरी यांनी या प्रकरणाचा संबंध थेट अजित पवारांच्या विमान अपघाताशी जोडला आहे
विधानपरिषदेचे आमदार आणि दिवंगत नेते अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेल्या अमोल मिटकरी यांनी दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर कॅप्टन अशोक खरातचा व्हीआरएस विमानाबरोबरचा एक फोटो शेअर केला होता. “अशोक खरातचे संबंध VSR पर्यंत असू शकतात तर विचार करा हा धागा कुठपर्यंत जाऊ शकतो?”, असा प्रश्न मिटकरी यांनी उपस्थित केला होता.
यानंतर आता अमोल मिटकरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना आणखी गंभीर आरोप केले आहेत. मिटकरी म्हणाले, “व्हिएसआर विमानाच्या समोर बाबाचा एक फोटो दिसत आहे. याचा अर्थ तो त्या विमानाने प्रवास करत होता. या बाबाचे राजकीय लागेबंधे आहेत. तसेच तो अघोरी पूजा करून घेत होता. त्याचे मोठ मोठे भक्त असून त्याची माहिती समोर आली आहे. व्हिएसआरचे मालक व्हिके सिंहबरोबरही खरातचे गुरू शिष्याचे नाते होते का?.”
अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर अघोरी पूजा
अमोल मिटकरी पुढे म्हणाले, “अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर अघोरी पूजा केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. यातून अजित पवार नकोसे झाल्याचे काही लोकांना वाटत होते का? आणि त्याचा मास्टरमाईंड या लिंगपिसाट बाबाचा भक्त होता का? या भक्ताच्या सांगण्यावरून हा अघोरी प्रकार घडवून आणला गेला का? याचाही तपास एसआयटीद्वारे व्हायला हवा. अघोरी पूजा आणि अजित पवारांचा अपघात याचा संबंध नाकारता येत नाही.”
खरातचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल
पोलिसांनी खरातच्या कार्यालयातून ५८ आक्षेपार्ह व्हिडीओ असलेला एक पेन ड्राईव्ह जप्त केला आहे. या व्हिडीओंमध्ये काय काय आहे, याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. भोंदू खरातचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात महिलांविषयीची त्याची मानसिकता स्पष्टपणे दिसून येते. सरकारवाडा पोलीस ठाण्यात एका महिलेने अशोक खरातविरुध्द दिलेल्या तक्रारीनुसार, स्वतः कडे दैवी शक्ती असल्याचा दावा करून मंत्र तंत्र आणि धार्मिक विधीच्या नावाखाली खरातने विश्वास संपादन केला होता. यानंतर त्याने कार्यालयात बोलावून गुंगीकारक पदार्थ खाण्यास दिल्यानंतर अत्याचार केला.
