राज्य सरकारकडून शुक्रवारी ( २ जून ) रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार उदयनराजे भोसले आणि अन्य आमदार उपस्थित होते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि भाजपा आमदार नितेश राणे यांच्यात खडाजंगी झाली आहे. ट्वीट करत मिटकरींनी सरकारवर टीका केली आहे. "छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा सनातन धर्म प्रचारासाठी होता का? छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेलं राज्य हे सनातनी नव्हतं. ते रयतेच स्वराज्य होतं. तुम्ही परत परत चुक करताय. तुमचा टकमकी वरून लवकरच जनता कडेलोट करेल," असं मिटकरी म्हणाले होते. हेही वाचा : आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी किती जागा लढवणार? छगन भुजबळ म्हणाले, “सध्याची परिस्थिती…” "तुम्ही रायगडाच्या पवित्र भूमीत सनातनी…" "ज्या सनातनी प्रवृत्तीने शिवरायांचा राज्याभिषेक नाकारला, त्यांनाच डोक्यावर घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सत्तेचा गैरवापर करुन तिथीनुसार हा कार्यक्रम राबवला. महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता याचं चोख उत्तर देईल. तुम्ही रायगडाच्या पवित्र भूमीत सनातनी सत्तेचा उन्माद केलाय," असा आरोपही मिटकरींनी केला होता. "उद्धव ठाकरेंना जाऊन सांगाव की…" यावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी अमोल मिटकरींना आव्हान दिलं होतं. "अमोल मिटकरी हे फार लहान आहेत. कारण, ते चेकशिवाय बोलत नाहीत. मला याचा अनुभव आहे. अमोल मिटकरी यांच्यात हिंमत असेल, तर उद्धव ठाकरेंना जाऊन सांगाव की, एकच शिवजयंती साजरी करावी. मग पुढचा चेक माझ्या नावाने देतो. माझा चेक क्लीअर होतो, बाउन्स होत नाही," असा टोलाही नितेश राणेंनी लगावला आहे. याला आता अमोल मिटकरींनी अप्रत्यक्षपणे नितेश राणेंवर घणाघात केला आहे. हेही वाचा : अहमदनगरचे नामांतर केल्याने अजित पवार म्हणाले, “नामांतराचा घाट हा…” "शिवाजी महाराजांना धर्म शुद्धीचा अधिकार नाही, असे…" ट्वीट करत अमोल मिटकरी म्हणाले की, "अरे टिल्ल्या तुझ्यात हिंमत असेल, तर सनातन्यांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला का विरोध केला? शिवाजी महाराजांना धर्म शुद्धीचा अधिकार नाही असे सनातन्यांनी का म्हटले? व गागाभट्टाला काशीवरून का बोलावले? या प्रश्नाचे उत्तर तेवढे दे माझाही बाउन्स न होणारा चेक तुला देतो," असं आव्हान मिटकरींनी दिलं आहे.