scorecardresearch

“…तर स्वत:च्या भावाला पक्ष देण्याचं धाडस दाखवा”, अमोल मिटकरींचं राज ठाकरेंना आव्हान

कार्यकर्त्यांना धुमधडाक्यात रामनवमी साजरी करायला सांगून स्वत: अचानक लंडनला का गेले? अमोल मिटकरींचा राज ठाकरेंना सवाल.

amol mitkari uddhav thackeray and raj thackeray
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी व मनसे अध्यक्ष राज ठाकरे (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली आहे. राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना धुमधडाक्यात रामनवमी साजरी करायला सांगून ते स्वत: अचानक लंडनला का गेले? याचं उत्तर त्यांनी महाराष्ट्राला द्यावं. तसेच “प्रभू रामचंद्राला आपला आदर्श मानत असाल, तर त्यांनी स्वत:च्या मावस भावाला पक्ष देण्याचं धाडस दाखवावं” असं आव्हान अमोल मिटकरींनी राज ठाकरेंना केलं.

“टीव्ही ९ मराठी”शी संवाद साधताना अमोल मिटकरी म्हणाले, “आज महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्मोत्सवाचा सोहळा धुमधडाक्यात साजरा होत आहे. आम्हीही रामनवमीचा सोहळा साजरा केला. काही दिवसांपूर्वी तथाकथित ‘हिंदूजननायक’ जे स्वत:ला रामभक्त म्हणवून घेतात, त्यांनी असं आवाहन केलं होतं की, कार्यकर्त्यांनी धुमधडाक्यात रामनवमी साजरी केली पाहिजे. मात्र ते स्वत: विदेशात निघून गेले.”

हेही वाचा- “प्रभू रामचंद्रांचा विचार घेऊनच…”, रामनवमीनिमित्त काँग्रेसकडून राहुल गांधींचा खास VIDEO शेअर

अमोल मिटकरी पुढे म्हणाले, “त्यांना (राज ठाकरेंना) रामाचा आदर्श घ्यायचा असेल आणि समाजात चांगला आदर्श निर्माण करायचा असेल, तर त्यांनी आपल्या सख्ख्या मावस भावाला पक्ष देण्याचं धाडस दाखवावं. आम्ही लहानपणापासून जे रामायण ऐकत आलो, वाचत आलो, त्यामध्ये हेच दाखवलं आहे की, राम आणि शत्रुघ्न हे सख्खे भाऊ होते. लक्ष्मण आणि भरत हे रामाचे सावत्र भाऊ होते. भरत हा सावत्र भाऊ असतानाही, प्रभू रामचंद्रांनी भावाशी भांडण न करता. भावावर टीका टिप्पणी न करता अयोध्येची गादी सन्मानाने भरतला दिली. ते लक्ष्मण आणि सीतेसह वनवासाला निघून गेले, हेच मी आजपर्यंत वाचलं आहे.”

हेही वाचा- “…तथाकथित ‘हिंदूजननायक’ परदेश दौऱ्यावर पळाले”, अमोल मिटकरींची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टोलेबाजी!

“त्यामुळे रामचंद्रांनी आपल्या सावत्र भावाला गादी दिली असेल, तर रामाला आपला आदर्श मानणाऱ्यांनी आपल्या सख्ख्या मावस भावाला पक्ष देण्याचं तरी धाडस दाखवावं, एवढीच मला अपेक्षा आहे. हिंदूजननायक नावापुढे लिहिणं आणि प्रभू रामचंद्रांच्या विचारावर चालणं, यामध्ये टोकाचा फरक आहे. त्यामुळे मला अपेक्षा आहे की, तुम्ही लंडनमध्ये निश्चित सुखरूप असाल. मात्र, आपल्या कार्यकर्त्यांना रामनवमी साजरी करण्याचे आदेश देऊन तुम्ही अचानक कुठे गेला? याचं उत्तर तुम्ही परत आल्यानंतर महाराष्ट्राला द्यावं,” असंही अमोल मिटकरी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 22:14 IST

संबंधित बातम्या