राज्यसभा निवडणुकीतील निकालानंतर भाजपाच्या नेत्यांकडून महाविकासआघाडीवर सातत्याने शाब्दिक हल्ले होत आहेत. खासदार सुजय विखे यांनी देखील आघाडीवर सडकून टीका केली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुजय विखेंवर हल्लाबोल केलाय. “राज्यसभेच्या निवडणुकीत कोणी कोणाला पाडले यात सुजय विखे पाटलांनी नाक खुपसण्याची गरज नाही, त्यांनी स्वतःचा मतदार संघ बघावा,” अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली. ते सोमवारी (१३ जून) अकोल्यात आरएनओ या वृत्तसंस्थेसोबत बोलत होते.

अमोल मिटकरी म्हणाले, “राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाल्यानंतर भाजपातील काही लोकं आता तोंडसुख घेत आहेत. त्यातील एक नाव म्हणजे खासदार सुजय विखे. सुजय विखेंना शिवसेनेची काळजी कधीपासून वाटायला लागली. त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं, त्यांचा लोकसभा मतदारसंघ सांभाळावा. त्यांनी महाविकासआघाडीच्या कार्यात नाक खुपसू नये किंवा ढवळाढवळ करू नये.”

“भाजपाला विधान परिषद निवडणुकीत राज्यसभेची किंमत भोगावी लागेल”

“आमचं सर्व व्यवस्थित आहे. विधान परिषद निवडणुकीत तुम्हाला राज्यसभेची किंमत भोगावी लागेल. भाजपाने घोडेबाजार करून त्यांचा उमेदवार निवडून आणला आहे. पैशापुढेच आम्ही हरतो. तुमचं सुडवृत्तीचं राजकारण आणि देवेंद्र फडणवीसांची कपटनीती जिंकलेली आहे, तुमचा विजय झालेला नाही,” असं मत अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “राष्ट्रपती पदासाठी शरद पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा”; पटोलेंच्या वक्तव्यावर मिटकरी म्हणाले, “सोनिया गांधी यांनी…”

“महाविकासआघाडीत नाक खुपसण्याचं काम करू नका”

“सुजय विखेंनी आपला लोकसभा मतदारसंघ सांभाळावा. तुमच्याबद्दल तेथील जनमाणसाच्या काय भावना आहेत हे आमच्यासारख्याला चांगलं माहिती आहे. महाविकासआघाडीत नाक खुपसण्याचं काम करू नका,” असा टोलाही मिटकरींनी विखेंना लगावला.